Shashank Ketkar New Movie: अभिनेता शशांक केतकर हा त्याच्या अभिनासाठी ओळखला जातो. आजपर्यंत त्याने विविध मालिका, काही चित्रपट, वेब सीरिज अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
‘होणार सून मी या घरची’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’, ‘पाहिले न मी तुला’, ‘सोप्प नसतं काही’, ‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘सुखांच्या सरींनी मन हे बावरे’, या मालिकांत विविध भूमिका साकारत शशांकने प्रेक्षकांच्या मनात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. शशांकने गुनाह या वेब सीरिजमध्येदेखील काम केले आहे.
याबरोबरच, ‘गोष्ट एका पैठणीची’, ‘वन वे टिकीट’, ‘३१ दिवस’, अशा चित्रपटांत काम केले आहे. सध्या शशांक मुरांबा या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. या मालिकेत शशांकने अक्षय ही भूमिका साकारली आहे. या मालिकेतील भूमिकेतून तो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
शशांक केतकर दिसणार नवीन भूमिकेत
आता शशांक एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. शशांक एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कैरी असे या चित्रपटाचे नाव आहे. आता चित्रपटात आणखी कोणते कलाकार आहेत, हे जाणून घेऊ…
लोकप्रिय कलाकार आहेत जोडीला
या पोस्टमध्ये शशांकबरोबर सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री सायली संजीवदेखील दिसत आहे. तसेच, अरुण नलावडे आणि सुलभा आर्यदेखील दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शंतनू गणेश रोडे यांनी केले आहे. ए ९१ फिल्म प्रोडक्शन, अमेय खोपकर एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती नवीन चंद्रा, नंदिता राव कर्नाद, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन यांनी केली आहे. ही पोस्ट सुनील शेट्टीनेदेखील शेअर केली आहे.

या पोस्टवर असे लिहिले आहे, “स्वत:चे आकाश शोधायला निघालेली कैरी. यंदा डिसेंबरमध्येच कैरी येणार”, पुढे १२ डिसेंबरला हा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचे लिहिले आहे. आता पोस्टवर दिसत असलेल्या कलाकारांचे लूकदेखील लक्ष वेधून घेत आहेत.
दरम्यान, आता चित्रपटाचा नेमका विषय काय असणार आहे, कलाकारांच्या भूमिका नेमक्या कोणत्या आणि काय असणार याबरोबरच चित्रपटाविषयी आणखी माहिती जाणून प्रेक्षक उत्सुक आहेत.
