Sneha Wagh on Marathi serials: स्नेहा वाघने आतापर्यंत मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. वयाच्या तेराव्या वर्षांपासून अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली आहे.
मराठी आणि हिंदी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा अनुभव
आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्नेहा वाघने तिचा मराठी आणि हिंदी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “एक व्यावसायिक कलाकार म्हणून मला कधी जास्त संघर्ष करावा लागला नाही. सुरुवातीला जेव्हा मी नवीन होते, तेव्हा शिकावं लागलं, कारण माझी घरची पार्श्वभूमी ही अभिनयाची नाही.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी शिकले, पुढे गेले. जसं चांगलं काम येत गेलं, तसं मी करत गेले. माझ्या खासगी आयुष्यात चढ-उतार होते, पण मला असं वाटतं की आज मी या ठिकाणी आहे कारण मी ते दिवस पाहिले आहेत; अनुभवातून मी घडले आहे.
“माझ्याबरोबर काही चुकीचं झालेलं नाही. सगळं छान चाललं आहे. माझे घरचे माझ्यावर प्रेम करतात. मी कृष्णावरती प्रेम करते. माझ्यावर कृपा आहे, त्यामुळे मला वाटत नाही की माझ्याबरोबर हे चुकीचं झालं किंवा मला कशाचा पश्चाताप आहे. माझ्या मनात अपराधीपणाची भावना नाही. भूतकाळात माझ्याबरोबर ज्या काही गोष्टी झाल्या, त्यामुळे मी माझी प्रगती करू शकले.
आगामी काळात कशाप्रकारचं काम करायला आवडेल? यावर स्नेहा म्हणाली की, जे येईल ते काम मी करत राहीन. आधी मी मला कशाप्रकारचं काम पाहिजे, याबाबत महत्वाकांक्षी होते. मात्र, आता मला असं वाटतं की अमुक एखादे पात्र मला साकारायचे आहे. मला आत्मविश्वास आहे की माझ्याकडे चांगले काम येईल. मला जे आवडेल ते काम करत राहीन.
टेलिव्हिजनवर काम करायला पुन्हा आवडेल का?
टेलिव्हिजनवर काम करायला पुन्हा आवडेल का? यावर स्नेहा म्हणाली की, मला टेलिव्हिजनवर काम करायला आवडेल, पण आता मराठी मालिका मी करू शकत नाही, कारण माझी भाषा आता थोडी बदलली आहे. मी जेव्हा हिंदीमध्ये काम करायला सुरुवात केली होती, तेव्हा माझी भाषा ऐकून माझ्या दिग्दर्शकांनी त्यांच्याकडील छडीने मारलं होतं. तुझी भाषा मराठी नाही, हिंदी नाही, कोणती भाषा आहे असं विचारलं होतं.
तेव्हा मला त्यांनी सांगितलं होतं की तू ज्या भाषेत विचार करशील ती तुझी भाषा चांगली होईल, त्यामुळे जर तुमची भाषा चांगली व्हायला हवी असेल तर तुम्ही त्या भाषेत विचार केला पाहिजे. त्यामुळे माझ्या भाषेत बदल झाले. त्यानंतर मी फिल्म मेकिंगसाठी लंडनलादेखील गेले होते. त्यामुळे ते एक वेगळं विश्व बघितलं. आता तर मी वृंदावनला राहत असल्याने मला ब्रज भाषा यायला लागली आहे”, असे म्हणत तिने तिचे मत सांगितले.