Subodh Bhave post for Priya Marathe: लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. चित्रपट, मराठी व हिंदी मालिका तसेच मराठी नाटकांमध्ये दमदार भूमिका साकारून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणाऱ्या प्रियाची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. प्रिया ही अभिनेता सुबोध भावेची चुलत बहीण होती, तसेच दोघांनी एकत्र कामही केलं होतं.
प्रिया मराठेच्या निधनाबद्दल सुबोध भावेने भावनिक पोस्ट केली आहे. प्रियाला काही वर्षांपूर्वी कर्करोगाचं निदान झालं. ती कर्करोगाशी झगडून पुन्हा काम करू लागली होती, पण कॅन्सरने पाठ सोडली नाही. माझी बहीण लढवय्या होती, पण तिची ताकद कमी पडली असं सुबोधने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
“प्रिया मराठे”
एक उत्तम अभिनेत्री, काही मालिका आणि चित्रपटात माझी सहकलाकार.
पण माझ्यासाठी त्याही पेक्षा महत्त्वाच नातं तिच्या बरोबर होतं. प्रिया माझी चुलत बहीण.
या क्षेत्रात आल्यावर तिने घेतलेली मेहनत, कामावरची तिची श्रद्धा या गोष्टी खूप कौतुकास्पद होत्या. प्रत्येक भूमिका तिने अतिशय मनापासून आणि समरस होऊन साकारली.
काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सरचं निदान झालं. त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला लागली.
नाटक, मालिका यामधून पुन्हा आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांसमोर गेली.
पण त्या कॅन्सरने काही तिची पाठ सोडली नाही.
“तू भेटशी नव्याने” या आमच्या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाळून आला.
या संपूर्ण प्रवासात तिचा जोडीदार शंतनू मोघे भक्कमपणे तिच्याबरोबर होता.
माझी बहीण लढवय्या होती,
पण अखेर तिची ताकद कमी पडली.
प्रिया तूला भावपूर्ण श्रद्धांजली
तू जिथे असशील तिथे तुला शांतता लाभावी हीच प्रार्थना
ओम शांती, अशी पोस्ट सुबोध भावेने केली आहे.
सुबोध भावेची पोस्ट
प्रिया मराठेचं अवघ्या ३८ व्या वर्षी निधन झालं. तिची अकाली एक्झिट मराठी कलाकारांसह चाहत्यांसाठी धक्कादायक ठरली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून मराठी कलाकार व चाहते तिला श्रद्धांजली वाहत आहेत.
दरम्यान, प्रियावर उपचार सुरू होते, त्यामुळे मागील वर्षभरापासून ती सोशल मीडियावरही सक्रिय नव्हती. तिची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट वर्षभरापूर्वीची आहे. त्यात तिने पतीबरोबरचे काही फोटो पोस्ट केले होते. हे फोटो तिच्या राजस्थान भेटीचे होते.