Suraj Chavan Wedding Card : ‘गुलीगत किंग’ सूरज चव्हाणच्या लग्नाची सध्या सोशल मीडियावर सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. या महिन्यात तो लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतीच सूरजने मुंबईत येऊन त्याच्या लग्नाची शॉपिंग केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरने त्याला खूप मदत केली. याशिवाय अंकिताने सूरज व संजनाचं केळवण सुद्धा केलं. याचवेळी चाहत्यांना सूरजच्या होणाऱ्या पत्नीची पहिली झलक पाहायला मिळाली. सध्या मोढवे गावी ‘गुलीगत किंग’ची लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळतंय.

सूरज चव्हाणने लग्नाआधी नुकताच त्याच्या नव्या घरात गृहप्रवेश केला. नवीन घर झाल्यावर आता सूरज त्याच्या नव्या आयुष्याची देखील सुरुवात करणार आहे. येत्या २९ नोव्हेंबरला सूरज व संजना लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांची लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. shatriya_ramoshi या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सूरज व त्याच्या कुटुंबीयांना टॅग करत ही लग्नपत्रिका शेअर करण्यात आली आहे.

सूरज चव्हाण ‘गोफणे’ परिवाराचा जावई होणार आहे. त्याच्या होणाऱ्या पत्नीचं नाव आहे संजना गोफणे. ही सूरजच्या चुलतमामांची मुलगी असून दोघांचंही लव्हमॅरेज आहे. सूरज-संजनाचा विवाहसोहळा २९ नोव्हेंबरला सासवड-जेजुरी रोड येथे पार पडणार आहे. सायंकाळी ६ वाजून ११ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर हा ‘गुलीगत किंग’ लग्नबंधनात अडकणार आहे.

सूरजचा साखरपुडा २९ तारखेलाच दुपारी १२ वाजता पार पडेल. यानंतर लगेच दुपारी २ वाजता हळदी समारंभाचा कार्यक्रम होईल आणि संध्याकाळी सूरज-संजनाचं लग्न पार पडेल. ही लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

suraj chavan wedding
सूरज चव्हाणची लग्नपत्रिका ( Suraj Chavan Wedding Card )

दरम्यान, सूरजची लग्नपत्रिका पाहताच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “सूरजदादा झाला आमच्या पुरंदरचा जावई…”, “आधी करिअर केलं मग लग्न दिलेला शब्द भावाने पूर्ण केला” अशा प्रतिक्रिया त्याच्या फॅन्सनी सूरजच्या पोस्टवर दिल्या आहेत. आता सूरजच्या लग्नाला कोण-कोण उपस्थिती लावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.