TMKOC fame bhavya Gandhi on rumours of relationship with co actress: मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांबद्दल अनेक चर्चा सातत्याने होतात. कधी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल, तर कधी त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल या चर्चा होताना दिसतात.
अनेकदा एकाच चित्रपटात, मालिकांमध्ये, वेब सीरिजमध्ये काम करत असलेले कलाकार नात्यात असल्याच्या चर्चादेखील पाहायला मिळतात. काही कलाकार खरंच नात्यात असतात तर काही कलाकारांबद्दल अफवा असतात.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम टपू आणि सोनू रिलेशनशिपमध्ये होते?
अभिनेता भव्य गांधीदेखील त्याची सहअभिनेत्री निधी भानुशालीबरोबर रिलेशनशिपमध्ये अशा चर्चांना उधाण आले होते. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेत्याने नुकतीच एक मुलाखत दिली. हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने निधी भानुशाली आणि त्याच्या रिलेशनशिपबद्दलच्या चर्चांवर वक्तव्य केले.
भव्य गांधी म्हणाला, “मी टपू सेनाबरोबर संपर्कात आहे. सगळेजण आपापल्या आयुष्यात चांगले काम करत आहेत.मालिकेत टपू आणि सोनूचे अफेअरचा ट्रॅक पाहायला मिळत होता. लोकांनी त्याला भव्य आणि निधीबरोबर जोडले.”
अभिनेता पुढे म्हणाला, “माझ्या इतर सहकलाकारांबरोबर जशी माझी मैत्री होती, तशीच माझी निधीबरोबरदेखील होती. आम्ही सर्वजण एकाच ग्रुपमध्ये असायचो. आम्ही खूप फिरायचो, गप्पा मारायचो. जेव्हा शूटिंग नसायचे तेव्हा चालायला जात असे. त्यादरम्यान कोणी काय पाहिले, काय विचार केला माहित नाही. मी आणि निधी चांगले मित्र आहोत. त्यापेक्षा वेगळे आमच्यात कोणतेही नाते नाही. मालिकेत जशी आमच्यात मैत्री दाखवली होती, तशी खऱ्या आयुष्यातदेखील आमच्यात उत्तम मैत्री आहे.”
निधी आणि भव्य हे दोन्ही कलाकार सध्या मालिकेचा भाग नाहीत. दोघांनीही मालिका सोडली आहे. भव्यने गुजराती चित्रपटांत काम करण्यासाठी मालिका सोडली. तर निधी तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मालिकेतून ती बाहेर पडली. दरम्यान, गेल्या काही वर्षांत लोकप्रिय कलाकार मालिकेतून बाहेर पडले आहेत.
