अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्यामुळे सिनेसृष्टीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. छोट्या पडद्यावर कमी कालावधीत यश संपादन करणाऱ्या या तरुण अभिनेत्रीच्या आयुष्यात असं काय झालं की तिला आयुष्य संपवावं लागलं? यावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा कथित प्रियकर शिझान खान याला काल अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणानंतर लव्ह जिहादवरुन वाद सुरु झाला आहे. त्यावर आता मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर अनेक खुलासे होताना दिसत आहे. तिच्या मृत्यूनतंर अभिनेत्रीच्या आईने ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेतील सह-कलाकार आणि कथित बॉयफ्रेंड शिझान खानला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यावर आता मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या प्रकरणाबद्दल सर्व माहिती दिली.
आणखी वाचा : अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, शिझान खानला ४ दिवसांची पोलीस कोठडी
“तुनिषा शर्मा ही टीव्ही शोमध्ये अभिनेत्री म्हणून काम करत होती. तुनिषा शर्मा आणि शिझान खान यांचे प्रेमसंबंध होते. त्या दोघांचा १५ दिवसांपूर्वी ब्रेकअप झाला होता. त्यानंतर तुनिषाने मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. यानंतर तुनिषाच्या आईने शिझान खानविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी शिझानला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला ४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
तसेच तुनिषाचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून त्यावर तिचा मृत्यू हा गळफास घेतल्याने झाला, असे सांगण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपी शिझान आणि तुनिषा या दोघांचा फोन जप्त करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी अद्याप अतिरिक्त प्रेमसंबंध, ब्लॅकमेलिंग किंवा ‘लव्ह जिहाद’ असा कोणताही प्रकार समोर आलेला नाही”, अशी माहिती मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली.
आणखी वाचा : तुनिषा शर्माच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला? कारण आले समोर
तुनिषा शर्मा ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या टिव्ही मालिकेत मुख्य भूमिका करत होती. या मालिकेचे शूटिंग वसई पुर्वेच्या कामण येथील भजनलाल स्टुडियोत सुरू होते. शनिवारी दुपारी मध्यंतरानंतर साडेतीन वाजता ती आपल्या मेकअप रूपमध्ये गेली आणि गळफास घेतला. ही बाब संध्याकाळी ५ वाजता सहकार्यांना समजली. तिला वसईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या संपूर्ण प्रकरणानंतर रात्री उशिरा तिचा मृतदेह जे. जे रुग्णालयात शवविच्छेदनसाठी आणण्यात आला. मुंबईतील जे. जे रुग्णालयात रात्री दीड वाजता तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरु झाले. पहाटे ४ वाजेपर्यंत तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.