अभिनेत्री प्रिया मराठेचे कर्करोगाशी झुंज देताना निधन झाले. प्रियाच्या निधनामुळे मराठी इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. प्रियाने ‘पवित्र रिश्ता’ या गाजलेल्या हिंदी मालिकेत काम केलं होतं. ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी या मालिकेतील सहकलाकार प्रियाच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना उषा नाडकर्णी म्हणाल्या, “प्रियाला कॅन्सरचं निदान झालंय, असं मी ऐकलं होतं. मला ते ऐकून वाईट वाटलं होतं. हे वय आहे का कॅन्सर व्हायचं? त्यानंतर तिच्यावर उपचार करण्यात आले आणि ती थोडी बरी झाली. मग तिने मालिकेत काम केलं. मध्यंतरी मी अंकिताच्या घरी गेले होते, तिथे प्रियाचा विषय निघाला होता. प्रियाचा त्रास वाढलाय असं मी तिथे ऐकलं.”

अंकिताच्या घरी काढलेली प्रियाची आठवण

पुढे त्या म्हणाल्या, “मी म्हणाले मी तिला अलीकडेच तर मालिकेत पाहिलं होतं. पण तिची प्रकृती खूप बिघडल्याचं मला तिथे समजलं. मग आपण सगळे तिला भेटायला जाऊयात असं म्हणाले. तर म्हणे नाही, तिचा पती नाही म्हणतोय. मला वाटतं तिचे केस गळाले असतील, प्रकृती खालावली असेल त्यामुळे ती कदाचित कम्फर्टेबल नसेल; त्यामुळे येऊ नका असं सांगितलं असेल. या गोष्टीला थोडेच दिवस झाले आहेत आणि आता तिच्या निधनाबद्दल समजलं.”

उषा नाडकर्णींना अश्रू अनावर

“आता घरी गणपती असल्याने तिथे जाऊ शकत नाही. पण मला प्रियाबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं. हे वय नाहीये जायचं. तिच्या लग्नालाही फार वर्षे झाली नाहीत. प्रिया खूप चांगली होती. जास्त बोलायची नाही, वायफळ बडबड करायची नाही. खूप शांत स्वभावाची होती. आनंदी असायची, सर्वांबरोबर मिळून-मिसळून राहायची. देवाने काय केलं तिच्याबरोबर. आमच्याबरोबर काम केलेल्या कलाकारांच्या मृत्यूबद्दल ऐकून खूप वाईट वाटतं. आधी सुशांत गेला, आता प्रिया गेली. खूप कमी वयात गेली, मला फार वाईट वाटतंय. तिचं वय नव्हतं जायचं,” असं म्हणत उषा नाडकर्णी रडू लागल्या.

प्रियाला मूलबाळ नव्हतं, तिने घर घेतलं होतं, असंही उषा नाडकर्णी म्हणाल्या. दरम्यान, आज ३१ ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता प्रियाचे मीरा रोड येथील राहत्या घरी निधन झाले. तिच्या पार्थिवावर सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.