अभिनेत्री अंकिता लोखंडेला इंडस्ट्रीत १६ वर्षं पूर्ण झाली आहेत. तसेच ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेलाही १६ वर्षं पूर्ण झाली आहेत. या मालिकेतून अंकितानं मालिकाविश्वात पदार्पण केलं होतं. अंकितानं त्यामध्ये अर्चना ही भूमिका साकारली होती. तिच्यासह दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतही त्या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत झळकला होता. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी अंकिताच्या सासूबाईंची सविता देशमुखची भूमिका साकारली होती. अशातच अभिनेत्रीनं नुकतंच त्यानिमित्तानं उषा यांना तिच्या मुंबईतील घरी आमंत्रित केलं होतं. १६ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अंकितानं तिच्या यूट्यूब चॅनेलवर या मालिकेबद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत.

अंकिता व उषा यांनी यावेळी दिवंगत सुशांत सिंह राजपूत व ‘पवित्र रिश्ता’बद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत. यावेळी उषा नाडकर्णी भावूक झाल्याचं दिसलं. ७९ वर्षीय उषा या अंकिता व तिचा पती विकी जैनशी संवाद साधताना म्हणाल्या, “मी मुंबईत एकटी राहते. त्यामुळे मला भीती वाटते की, मी एकटी असताना कधी पडले वगैरे आणि कोणाला याबाबत काही कळलंच नाही तर. माझ्या भावाचंसुद्धा नुकतंच निधन झालं. जर तो हयात असता आणि त्याला समजलं असतं की, मी या परिस्थितीतून जात आहे, तर तो धावत माझ्याकडे आला असता. पण आता मी कोणाला सांगणार?”

उषा यांना आधार देत अंकिता म्हणाली, “तुम्ही एकट्या नाही आहात. मला सांगा मी आहे. तुम्ही खूप खंबीर आहेत. इतक्या वर्षांपासून पाहत आहे. गेली अनेक वर्षं एकट्या राहत आहेत.” पुढे अंकितानं तिचा सहकलाकार सुशांतबद्दलही वक्तव्य केलं आहे. ती म्हणाली, “सुशांत खूप चांगला अभिनेता होता. तो मला खूप मदत करायचा. मी नवीन असताना मोठ्या कलाकारांसमोर इतके मोठे सीन कसे करणार याची मला भीती वाटायची तेव्हा तो मला शिकवत असे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘पवित्र रिश्ता’ मालिकेबद्दल बोलायचं झालं, तर ही मालिका ‘झी टीव्ही’ वाहिनीवर सर्वाधिक काळ सुरू राहिलेली तिसरी मालिका आहे. या मालिकेत अंकिता व सुशांत यांच्यासह आशा नेगी, ऋत्त्विक धनजानी, करणवीर मेहरा, हितेश तेजवानी यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका ‘तिरुमती सेल्वम’ नावाच्या तमीळ मालिकेचा रिमेक होती.