Harshada Khanvilkar distributed notebooks to students: लोकप्रिय अभिनेत्री हर्षदा खानविलकर सध्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत काम करत आहेत. या मालिकेतील त्यांची लक्ष्मी ही भूमिका प्रेक्षकांची लाडकी झाली आहे. हर्षदा खानविलकर यांनी याआधी ‘पुढचे पाऊल’, ‘रंग माझा वेगळा’, अशा मालिकांत काम केले आहे.
आता हर्षदा खानविलकर त्यांच्या भूमिकांमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी हर्षदा खानविलकर यांनी ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील इतर कलाकारांबरोबर चला हवा येऊ द्याच्या मंचावर हजेरी लावली होती.
त्यावेळी हर्षदा खानविलकर यांची तुला केली. तराजूच्या एक बाजूवर हर्षदा खानविलकर बसल्या, तर दुसऱ्या बाजूवर वह्या पुस्तके ठेवली गेली. तसेच त्या वह्या-पुस्तके गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जातील, असे जाहीर करण्यात आले होते. आता हर्षदा खानविलकर यांनी स्वत: विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत या वह्या-पुस्तकांचे वाटप केले आहे.
सोशल मीडियावर त्यांनी शाळेतील मुलांबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. या वह्या पुस्तकांचे वाटप करण्यासाठी त्या सांगलीतील श्री दत्त विद्या मंदिर या शाळेत गेल्या होत्या. याचे काही व्हिडीओदेखील शेअर केले आहेत.
हर्षदा खानविलकर म्हणाल्या….
मराठी सीरिअल्स ऑफिशिअलशी हर्षदा खानविलकर यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “आयुष्यात कधी कधी अनपेक्षित गोष्टी घडतात आणि त्या आत्मिक आनंद देतात, कारण त्या अनपेक्षित असतात. हे वर्ष माझ्यासाठी अशाच आनंदाचे वर्ष आहे. त्याचे कारण झी मराठी ठरली आहे. २०२५ च्या सुरुवातीला आमची मालिका ‘लक्ष्मी निवास’ प्रक्षेपित झाली, ज्यात मी माझ्या मागील भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. या भूमिकेसाठी प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे.”
पुढे त्या म्हणाल्या, “आम्ही ‘चला हवा येऊ द्या’चा विशेष भाग शूट केला होता, जिथे माझी तुला करून गरजू मुलांना पुस्तकदान केले जाणार होते. पहिल्यांदा मला वाटलं की हे एक प्रॅन्क असेल. ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर प्रँक होतात, पण ती गोष्ट खरी होती. तुला झाल्यानंतर मला वाटलं की आता त्या वह्या पुस्तके शाळेतील मुलांपर्यंत पोहोचवली जातील. मात्र, या वह्या पुस्तके मुलांपर्यंत पोहोचवण्याची संधी मला दिली, त्यासाठी झी मराठीचे खूप आभार.”
हर्षदा खानविलकर भावना व्यक्त करत पुढे म्हणाल्या, “मुलांच्या डोळ्यातील आनंद आणि हसू पाहून मन भरून आलं. या पूर्वीदेखील झी मराठीने ‘कमळी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने गरजू मुलींसाठी सायकल वाटप केलं होतं. सामाजिक बदल घडवण्याचं नेतृत्व हातात घेणाऱ्या अशा चॅनेलसोबत काम करण्याची संधी मला मिळाली यासाठी मी खरंच धन्य आहे.”
दरम्यान, लक्ष्मी निवास ही लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका आहे. या मालिकेतील लक्ष्मी व श्रीनिवास हे सर्व कुटुंबाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतात. आता मालिकेत आगामी काळात काय ट्विस्ट येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
