अभिनेता हार्दिक जोशीचा ‘जाऊ बाई गावात’ हा नवा कार्यक्रम ४ डिसेंबरपासून ९.३० वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे ‘झी मराठी’ वाहिनीवरील काही मालिकांचा वेळा बदलण्यात आल्या आहेत. ४ डिसेंबरपासून ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका दुपारी २ वाजता प्रसारित होणार आहे. तर ‘चला हवा येऊ द्या’ संध्याकाळी ८.३० वाजता प्रसारित होणार आहे. अशातच ‘झी मराठी’वरील एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे. मालिकेतील काही कलाकारांनी शेवटचे खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘झी मराठी’वरील ही लोकप्रिय मालिका म्हणजे ‘३६ गुणी जोडी’. काही दिवसांपूर्वी या मालिकेची वेळ बदलून २ दुपारी वाजता करण्यात आली म्हणून प्रेक्षकांची विरोध दर्शवला होता. सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यामुळे ‘झी मराठी’ वाहिनीने हा निर्णय मागे घेतला आणि ४ डिसेंबरपासून ‘३६ गुणी जोडी’ आधीच्या वेळेत रात्री ११ वाजता प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. पण आता ही मालिका लवकरच ऑफ एअर होणार आहे. मालिकेतील वेदांत म्हणजेच अभिनेता आयुष्य संजीव आणि सार्थक म्हणजे अभिनेता सागर कोरडे यांनी सोशल मीडियावर शेवटच्या क्षणाचे फोटो शेअर करून पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा – CID फेम फ्रेडरिक्सला हृदयविकाराचा झटका; ५७ वर्षीय दिनेश फडणीस यांची व्हेंटिलेटरवर सुरू आहे मृत्यूशी झुंज

अभिनेता आयुष्य संजीवने वीडब्ल्यू इन्फ्राच्या त्याच्या केबिनमधले फोटो शेअर करून लिहिलं आहे, “वेदांतच्या केबिनमधले शेवटचे काही क्षण! यामध्ये सर्वात जवळची होती वेदांची खुर्ची. जिने मला खूप धैर्य, धडे आणि सुंदर आठवणी दिल्या. मला या खुर्चीची आणि वीडब्ल्यू इन्फ्राची कायम आठवण येईल.”

तसेच अभिनेता सागर कोरडेनं लिहिलं की, “सांगायला थोडं कठीण जातंय, पण सार्थकचा प्रवास इथे संपतोय… मायबाप रसिकप्रेक्षक, झी मराठी आणि सेवेंथ सेन्स मीडिया परिवाराचे मनापासून खूप खूप आभार…लवकरच भेटुयात…”

हेही वाचा – ‘आई कुठे काय करत’ फेम गौरी कुलकर्णीने सांगितला अभिनय क्षेत्रातील पदार्पणाचा किस्सा, अभिनेत्री म्हणाली, “पूर्वी मायक्रोसॉफ्टच्या…”

आयुष्य आणि सागरच्या पोस्टवरून ‘३६ गुणी जोडी’ लवकरच प्रेक्षकांच्या निरोप घेणार असल्याचं निश्चित झालं आहे. पण मालिकेच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “प्लीज मालिका बंद करू नका”, “अरेरे…झी वरच्या सगळ्या मालिकांमध्ये ही मालिका उजवी होती. माझी तर अत्यंत आवडती मालिका…अजून दोन वर्ष चालेलं असं वाटलं होतं…टीआरपीच्या नादात एका चांगल्या मालिकेला प्रेक्षक मुकले…”, अशा प्रकारच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया अभिनेत्यांच्या पोस्टवर उमटल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi serial 36 guni jodi will off air pps