दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य आणि त्याची प्रेयसी समंथा रुथ प्रभू दोघेही सध्या आयुष्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहेत. लवकरच हे प्रेमीयुगुल विवाहबंधनात अडकणार आहेत. चित्रपटसृष्टीत त्यांच्या लग्नाविषयी चर्चा सुरू असतानाच चाहत्यांना दोघांच्या लग्नासंबंधी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता आहे. हे लग्न कशा पद्धतीने होणार, समंथा आणि चैतन्य कोणत्या पोषाखात दिसणार याविषयीची सर्व माहिती आता समोर आली आहे.
हे दोघं डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याची याआधी चर्चा होती. त्याप्रमाणेच गोव्यात त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. हे जरी डेस्टिनेशन वेडिंग असलं तरी लग्न मात्र पारंपारिक पद्धतीनेच होणार असे सांगितले जात आहे. या लग्नसोहळ्याला जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित असणार आहेत. जवळपास १०० जण या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. ऑक्टोबरमध्ये हे लग्न होणार असून संध्याकाळच्या सुमारास हे लग्नसमारंभ पार पडणार आहे.
PHOTOS : क्रिकेटर्सच्या पत्नींमध्ये जमली मैत्री
आठवड्याअखेर लग्नाचा मुहूर्त असल्याने पहिल्या दिवशी पारंपारिक तेलुगू पद्धतीने विधी पार पडणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी ख्रिश्चन पद्धतीने लग्न होणार आहे. गोव्यातील एका चर्चमध्ये ख्रिश्चन पद्धतीने विवाह विधी पार पाडण्यात येतील. नागा चैतन्य आणि समंथाचा जानेवारीमध्ये मोठ्या थाटामाटात साखरपुडा झाला होता. फक्त जवळच्या कुटुंबियांसाठी असलेला हा सोहळा कोणत्याही लग्न सोहळ्यापेक्षा कमी नव्हता.