अभिनेता मनोज वाजपेयी याची प्रमुख भूमिका असलेली ‘द फॅमिली मॅन’ ही वेब सीरिज सध्या प्रचंड चर्चेत आहे. या वेबसिरीजमध्ये भारत पाकिस्तान युद्द, जिहाद, दहशतवादी संघटना, धार्मिक दंगली यांसारख्या मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. दरम्यान, या मालिकेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आक्षेप घेतला आहे. या मालिकेतून हिंदूंबाबत आक्षेपार्ह माहिती दिली जात असल्याचा आरोप आरएसएसने केला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘पांचजन्य’ या मासिकातून संघाने आपला विरोध दर्शवला आहे. या मासिकातून ‘द फॅमिली मॅन’ या मालिकेबाबत नाराजी व्यक्त करणारा एक लेख प्रसिद्ध करण्यात झाला आहे. “या मालिकेतून हिंदूंबाबत चूकीची माहिती पसरवण्यात येत आहे. हिंदूंनी कधीच काश्मीरमधील नागरिकांवर अत्याचार केले नाहीत. देशात झालेल्या दंगलींना हिंदू जबाबदार नव्हते. तसेच सीरियामधून प्रशिक्षण घेऊन आलेले मुस्लीम दहशदवादी हिंदूंच्या अत्याचाराला कंटाळून दहशतवादी झाले. असा या मालिकेत देण्यात आलेला संदर्भ चुकीचा आहे. या मालिकेची निर्मिती देशद्रोही प्रवृत्तीतून करण्यात आली आहे.” असे या लेखात म्हटले आहे. याआधी अशाच प्रकारची टीका या मासिकाने ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘घोल’ या वेबसिरीजवर देखील केली होती.

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झालेल्या ‘द फॅमिली मॅन’ या वेबसिरीजमध्ये श्रीकांत तिवारी नावाच्या एका मध्यमवर्गीय माणसाची कथा दाखवण्यात आली आहे. हा माणूस आपल्या कुटुंबासमोर अत्यंत घाबरट असल्याचे नाटक करतो, तर दुसरीकडे तो भारतातील चांगल्या गुप्तहेरांपैकी एक आहे. नॅशनल इंटॅलिजन्स एजन्सीच्या एका विशेष पथकासाठी काम करणाऱ्या श्रीकांतच्या या दुहेरी आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर आधारित ही नवी मालिका आहे. या मालिकेत मनोज बाजपेयीबरोबरच प्रियमणी, शारीब हाश्मी, शरद केळकर, नीरज माधव, गुल पनाग, सुंदीप किशन, दर्शन कुमार, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी हे कलाकार देखील आहेत.