गतवर्षी हिंदी चित्रपटसृष्टीत मोठ्या प्रमाणावर बदल घडल्याचे, ‘२० व्या वार्षिक लाइफ ओके स्क्रीन पुरस्कार सोहळ्या’च्या निमित्ताने बॉलिवूडवर टाकलेल्या दृष्टीक्षेपात लक्षात येते.
‘प्रेमकथा’, ‘दुःखद शेवट’ आणि ‘शहरी भागातील सत्यकथा’ यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अशा प्रकारच्या चित्रपटांनी २०१३ सालच्या बॉलिवूडपटांवर आपली छाप सोडली. याशिवाय अन्य वेगळ्या प्रकारच्या चित्रपटांनीदेखील या बदलात आपले योगदान दिले. चित्रपटात आणि चित्रपटसृष्टीत होत असलेला हा बदल निश्चितच नोंद घेण्यासारखा आहे. अशा वेगळ्या प्रकारच्या चित्रपटांनी प्रमुख धारेतील चित्रपटांपेक्षा आपले वेगळेपण सिद्ध केले. चित्रपट निर्मितीच्या सर्व क्षेत्रात नव्या गुणवत्तेला भरपूर वाव मिळाला. या चित्रपटांनी ‘बॉक्स ऑफिस’वर नवे रेकॉर्ड स्थापन केले. ‘कमला पसंद २०व्या वार्षिक लाइफ ओके स्क्रीन पुरस्कार सोहळ्या’च्या नामांकनावरून नजर फिरवल्यास याचा प्रत्यय येतो.
शैलींचा विस्तार
२०१३मध्ये प्रेमकथेवर आधारित ‘रांझणा’, ‘लुटेरे’ आणि ‘गोलियों की रासलीला राम-लीला’सारख्या चित्रपटांचा ‘बॉक्स ऑफिस’वर बोलबाला राहिला. असे असले तरी काही धाडसी चित्रपटकर्त्यांनी नेहमीचा धोपट मार्ग सोडून नवे धाडसी प्रयोग केले.  रेमो डिसूझाने संपूर्णपणे नृत्यावर आधारीत ‘एबीसीडी: एनी बडी कॅन डान्स’ नावाचा चित्रपट बनवला. ‘एबीसीडी’ चित्रपटाने अनेकांना असे धाडसी प्रयोग करण्यासाठी प्रेरीत केले. नंतर, सैफ अली खानने ‘गो गोवा गॉन’सारखा ‘झोंम्बी’ प्रकारातील चित्रपट पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये दाखल केला. या चित्रपटातील संवाद वेगळ्या धाटणीचे होते. अभिनेता कुणाल खेमुचे ‘उत्कृष्ट संवाद’ विभागात या चित्रपटासाठी नामांकन झाले आहे.
उत्कृष्ट कथानक
‘शिप ऑफ थिसस’, ‘लंचबॉक्स’ आणि ‘शाहिद’सारख्या चित्रपटांचे उत्कृष्ट कथानक आणि सहज अभिनय ह्या जमेच्या बाजू होत्या. या चित्रपटांना सर्व थरांवर चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटांची निर्मिती प्रतिथयश दिग्दर्शकांकडून करण्यात आली नसल्याने, या नवख्या दिग्दर्शकांसमोर अनेक आर्थिक अडचणी उभ्या ठाकल्या. परंतु, किरण राव,  करण जोहर आणि आमिर खानच्या रूपाने त्यांना मदतीचा हात मिळाला.
मोठी झेप
‘आमिर’ चित्रपटातील भूमिकेमुळे राजीव खंडेलवालला मिळालेल्या यशाने दूरचित्रवाहिनीवरील अनेकांना चित्रपटात काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली. परंतु, कोणालाही यशाची चव चाखता आली नाही. असे असले तरी, २०१३ साली छोट्या पडद्यावरील यशस्वी अभिनेता सुशांत सिंग राजपूतने करिश्मा घडवला. ‘काय पो छे’ या त्याच्या पहिल्याच चित्रपटाने त्याला रातोरात यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याचे ‘उत्कृष्ट अभिनेता’ विभागात नामांकन झाले आहे. दूरचित्रवाणीवरील अमित साध या अन्य अभिनेत्यानेसुद्धा ‘काय पो छे’ चित्रपटात काम केले असून, त्याचे ‘उत्कृष्ट सह-कलाकार (पुरूष)’ विभागात नामांकन झाले आहे. तर, छोट्या पडद्यावर अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणारा मनिष पॉलचे ‘मिकी वायरस’ चित्रपटातील भूमिकेसाठी ‘उत्कृष्ट नव-कलाकार (पुरूष)’ विभागात नामांकन झाले आहे.
१०० करोड क्लबचा काळ जुना…
अयान मुखर्जी सारखा तरूण दिग्दर्शक आणि रणबीर-दीपिकासारखी बॉलिवूडमधली तारांकीत जोडी असलेल्या ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील १०० कोटी कमाईला इतिहासात जमा केले. या चित्रपटाने तब्बल २०० कोटींचा धंदा केला. यानंतर आलेल्या ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘क्रिश २’ आणि ‘धूम ३’ने देखील २०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवले.
नवीन गुणवत्तेला मागणी
त्याला अनेकांनी हसण्यावारी नेले. त्याच्या सामान्य दिसण्यावर अनेकांनी टिका केली, असे असले तरी सावळ्या रंगाच्या धनुषने आपली गुणवत्ता सिद्ध केली. ‘रांझणा’मधील त्याच्या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले. याच चित्रपटासाठी त्याचे ‘उत्कृष्ट अभिनेता’ विभागात नामांकन झाले आहे. २०१३ च्या नामांकनावर नजर फिरवली असता निम्रत कौर – उत्कृष्ट कलाकार (स्त्री) – (लंचबॉक्स), वरुण शर्मा – उत्कृष्ट विनोदी अभिनेता – (फुकरे), नीरज कबी – उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (पुरूष) – (शिप ऑफ थिसस), पंकज कुमार – उत्कृष्ट चलचित्रनिर्मिती / चलतचित्र (Cinematography) – (शिप ऑफ थिसस) अशा नवीन गुणवत्तेची हिंदी चित्रपटासृष्टीतील प्रवेशाची यादी नजरेत भरण्यासारखी आहे.