scorecardresearch

उत्कंठावर्धक भावपट

एका व्यावहारिक नात्यात बांधलेल्या दोन स्त्रिया, दैनंदिन आयुष्यात त्यांच्यातील व्यावहारिक नात्यापेक्षाही अधिक जवळच्या नात्याने त्या घट्ट बांधल्या गेल्या आहेत.

|| रेश्मा राईकवार

एरव्ही चित्रपटगृहात वेगाने प्रदर्शित होणाऱ्या बिग बजेट चित्रपटांच्या भाऊगर्दीत ओटीटीवर फारसा गाजावाजा न करता प्रदर्शित होणारे अनेक चित्रपट दुर्लक्षित राहातात. त्यांच्यात प्रसिद्ध कलाकार असोत वा नसोत, वेगळय़ा वाटेने जाणारे हे चित्रपट कधी कधी खरोखरच सुखद धक्का देऊन जातात. ताकदीची पटकथा आणि तितक्याच ताकदीने साकारलेली अभिनयाची जुगलबंदी अनुभवण्याची पर्वणी देणारा ‘जलसा’ हा अ‍ॅमेझॉन प्राईमवरचा सुखद धक्का म्हणता येईल.

एका व्यावहारिक नात्यात बांधलेल्या दोन स्त्रिया, दैनंदिन आयुष्यात त्यांच्यातील व्यावहारिक नात्यापेक्षाही अधिक जवळच्या नात्याने त्या घट्ट बांधल्या गेल्या आहेत. मात्र एक दुर्दैवी घटना घडते आणि बरोबर त्या उलट अशा एका विचित्र गुंत्यात दोघीही अडकतात. सत्य बोलण्यासाठी आणि भल्याभल्यांची पोलखोल करण्यासाठी प्रसिद्ध असलेली पत्रकार माया मेननची (विद्या बालन) ही कथा आहे. एक मुलाखत गाजवल्यानंतर रात्री उशिरा घरी परतणाऱ्या मायाकडून एक अपघात होतो. त्या क्षणी गोंधळलेली माया तिथून पळ काढते. आपल्याकडून काय झालं आहे, त्याचे कुठे पडसाद उमटत आहेत का याचा अंदाज घेणाऱ्या मायाला दुसरा धक्का बसतो. या घटनेचा सगळय़ात मोठा धागा हा तिच्या घराशी जोडला गेला आहे. ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरणावर बेतलेली या चित्रपटाची कथा ही पूर्णपणे नवीन आहे असे म्हणता येणार नाही. त्यातला दुर्दैवी योगायोगही नवीन नाही, मात्र ज्या प्रामाणिक पद्धतीने यातल्या दोन मुख्य स्त्री व्यक्तिरेखांची हाताळणी केली आहे त्यामुळे हा चित्रपट वेगळा ठरतो. कुठलीही शब्दबंबाळ रचना न करता या दोन ताकदीच्या स्त्री पात्रांकडून आपल्याला या गुंतागुंतीच्या भावपटात खेळवत ठेवण्यात दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी यशस्वी ठरले आहेत.

माया आणि रुखसाना या दोन व्यक्तिरेखा चित्रपटात महत्त्वाच्या आहेत. एक श्रीमंत आहे, दुसरी गरीब आहे. एक मालक आहे, तर दुसरी जीवाभावाने ते घर सांभाळणारी त्या घरची एक मोलकरीण आहे. पण एवढंच नाही आहे. या दोघींचे स्वभाव इथे महत्त्वाचे ठरतात. माया मनाने वाईट नाही, ढोंगी नाही, ती कणखर आहे. पण त्या एका प्रसंगात तिचा हा कणखरपणा गळून पडतो, ती पळ काढते. तर दुसरीकडे रुखसाना अगदी साधी आहे. तिचं तिच्या मुलीवर खूप प्रेम आहे. ती मायाच्या विशेष मुलालाही तेवढाच जीव लावते. तरीही आपल्या मुलीच्या आयुष्यात घडलेल्या घटनेला जबाबदार कोण?, हे तिला जाणून घ्यायचं आहे. त्याला शिक्षा व्हायला हवी, असंही तिला वाटतं आहे. या दोन्ही स्त्रिया मुळातच खूप प्रामाणिक आहेत, खऱ्या आहेत. आणि म्हणून या चित्रपटात त्यांचा त्यांच्याशी सुरू असलेला संघर्ष आणि त्या विचित्र परिस्थितीपलीकडे पोहोचून त्यांनी केलेला विचार जास्त महत्त्वाचा ठरतो. या चित्रपटाचं पहिलं श्रेय हे लेखकांना द्यायला हवं. अगदी पहिल्या काही मिनिटांत वेळ न दवडता आपल्याला कथेतून काय सांगायचं आहे ते थेट सांगण्याचा प्रयत्न लेखकांनी केला आहे. प्रज्वल चंद्रशेखर, खुद्द दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी, हुसैन आणि अब्बास दलाल या चार लेखकांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. अत्यंत बांधीव अशी पटकथा मध्यंतरात काही नको असलेल्या व्यक्तिरेखा आणि प्रसंगांमध्ये रेंगाळते. कथेचा शेवटही काहीसा परिचित असला तरी गुंतागुंतीच्या भावनांमध्ये शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याचं आव्हान लेखक आणि दिग्दर्शक दोघांनीही उत्तम पेललं आहे.

सुरेश त्रिवेणी यांचे दिग्दर्शन असलेला ‘तुम्हारी सुलू’ हा चित्रपटही प्रेक्षकांना आवडला होता. त्यामुळे त्यातील काही चेहरे याही चित्रपटात ओळखीचे वाटतील. विद्या बालन आणि शेफाली शहा या दोन प्रतिभावान अभिनेत्रींना एकत्र पाहाणं हा खूप वेगळा अनुभव ठरला आहे. दोघींच्या व्यक्तिरेखांचा बाज वेगळा आहे. तरी दोघींनीही आपापल्या पद्धतीने माया आणि रुखसाना जिवंत केल्या आहेत. कमीतकमी संवाद, देहबोली आणि अभिनयातून त्या पुरेपूर व्यक्त झाल्या आहेत. त्या दोघींबरोबरच ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी साकारलेली आईही तितकीच ताकदीची आहे. याशिवाय, मायाच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या सूर्या या बालकलाकारानेही खूप छान काम केले आहे. बाकी ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरणात ओघाने येणारे पोलीस, साक्षीदार, सीसीटीव्ही फुटेज, कोणी एक स्थानिक नेता, मायाप्रमाणेच उत्तम पत्रकार होण्याची इच्छा असणारी तरुण पत्रकार रोहिणी, मायाचा घटस्फोटित नवरा अशा कितीतरी व्यक्तिरेखा येतात. त्यातल्या काही व्यक्तिरेखा आणि गोष्टी कशासाठी, असाही प्रश्न पडतो. पण याचा फारसा धक्का न लागताही चित्रपटाचा प्रभाव शेवटपर्यंत कायम राहातो. उत्तम हाताळणी, अभिनय यांच्या जोरावर शेवटपर्यंत खुर्चीत खिळवून ठेवणारा असा हा भावपट आहे.

जलसा

दिग्दर्शक – सुरेश त्रिवेणी

कलाकार – विद्या बालन, शेफाली शाहा, रोहिणी हट्टंगडी, इक्बाल खान, कशिश रिझवान, मानव कौल.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Theaters big budget ott movies ignored akp

ताज्या बातम्या