मुंबई : स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त साधत प्रदर्शित झालेल्या हिंदीतील दोन मोठय़ा चित्रपटांनी सपाटून मार खाल्लेला असताना मराठी चित्रपटांना मात्र प्रेक्षकांनी आणि पर्यायाने चित्रपटगृहांनी उचलून धरले आहे. हिंदी चित्रपटांचे खेळ कमी करून मराठी चित्रपटांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या आठवडय़ात प्रदर्शित झालेल्या ‘दगडी चाळ २’ आणि ‘टकाटक २’ या दोन चित्रपटांसह आणखी तीन मराठी चित्रपटांचे खेळ राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये धडाक्यात सुरू आहेत.

‘लालसिंग चढ्ढा’ आणि ‘रक्षाबंधन’ हे दोन मोठे चित्रपट १२ ऑगस्टला प्रदर्शित झाल्यानंतरच्या आठवडय़ात तापसी पन्नूचा ‘दोबारा’ वगळता एकही हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला नाही. मराठीत त्याआधीच्या आठवडय़ात ‘दे धक्का’ आणि ‘एकदा काय झाले’ हे दोन चित्रपट, तर गेल्या आठवडय़ात ‘टकाटक २’ आणि ‘दगडी चाळ २’ असे आणखी दोन चित्रपट प्रदर्शित झाले. ‘लालसिंग चढ्ढा’ आणि ‘रक्षाबंधन’ या दोन हिंदी चित्रपटांचे तिकीट खिडकीवरील अपयश आणि अन्य मोठे चित्रपट प्रदर्शित न झाल्याची बाब मराठी चित्रपटांच्या पथ्यावर पडली. एरवी हिंदीतील चित्रपटांना चांगला प्रेक्षक प्रतिसाद मिळाला की मराठीतील कमाई करणारे चित्रपट उतरवले जातात. परंतु सध्या हिंदी चित्रपटांऐवजी राज्यभरात छोटय़ा-मोठय़ा शहरांतील चित्रपटगृहांमधून पाच मराठी चित्रपटांचे खेळ मोठय़ा प्रमाणावर सुरू आहेत.

Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

१५-१६ ऑगस्टदरम्यान जोडून आलेल्या सुट्टय़ांमध्ये प्रेक्षक हिंदी चित्रपट पाहायला येतील, असा अंदाज होता. मात्र तो खोटा ठरल्याने १८ ऑगस्टनंतर ‘दे धक्का’ चित्रपटाला खेळ वाढवून मिळाले. आता तिसऱ्या आठवडय़ातही शंभरहून अधिक चित्रपटगृहांत सुरू असलेल्या या चित्रपटाने सव्वाचार कोटींहून अधिक कमाई केली आहे, अशी माहिती चित्रपट वितरक प्रणित रायकर यांनी दिली. तर २९ जुलैला प्रदर्शित झालेला ‘टाईमपास ३’ पाचव्या आठवडय़ातही चित्रपटगृहांमध्ये सुरू असून पुण्या-मुंबईप्रमाणेच राज्यात अन्य ठिकाणी ज्या चित्रपटगृहांतून चित्रपट उतरवण्यात आला होता, तिथेही पुन्हा तो दाखवला जात आहे, अशी माहिती ‘झी स्टुडिओ’चे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी यांनी दिली. ‘टाईमपास ३’ने आतापर्यंत साडेअकरा कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘टकाटक २’ आणि ‘दगडी चाळ २’ या दोन्ही उत्तरकथा चित्रपटांचे (सिक्वल) सध्या बहुपडदा चित्रपटगृहातून दिवसाला ४ ते ७ खेळ सुरू आहेत. ‘टकाटक २’ला मराठवाडा, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, अकोला आणि अगदी गोव्यातही उत्तम प्रतिसाद मिळत असून तो सध्या ३३३ चित्रपटगृहांत सुरू आहे, अशी माहिती ‘रिलायन्स एन्टरटेन्मेंट’चे व्यवसायप्रमुख सुनील वाधवा यांनी दिली. मराठीतही ऐतिहासिकपट आणि चरित्रपटांची लाट आली होती, तसाच सध्या ‘सिक्वल’पटांचा बोलबाला सुरू असून प्रेक्षकांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिल्याचे वाधवा यांनी सांगितले. ‘दगडी चाळ’प्रमाणेच त्याच्या सिक्वललाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल निर्मात्या संगीता अहिर यांनी समाधान व्यक्त केले. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून अवघ्या तीन दिवसांत दोन कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. पुढचा किमान आठवडाभर मराठी चित्रपटांना चांगला गल्ला जमवण्याची संधी आहे.

हिंदीचे अपयश पथ्यावर

‘लालसिंग चढ्ढा’ आणि ‘रक्षाबंधन’ हे चित्रपट अपयशी ठरले. शिवाय मोठे हिंदी चित्रपटही प्रदर्शित झाले नाहीत. त्यामुळे प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळणाऱ्या मराठी चित्रपटांचे खेळ वाढवण्यात आले. एरवी हिंदीतील चित्रपटांना चांगला प्रेक्षक प्रतिसाद मिळाला की मराठीतील कमाई करणारे चित्रपट उतरवले जातात. परंतु सध्यातरी हिंदीऐवजी मराठीची चलती आहे. मराठी चित्रपट चांगली कमाई करीत आहेत.

प्रेक्षकांची पसंती सिक्वलपटांना

सध्या ‘सिक्वल’पटांचा बोलबाला सुरू आहे. प्रेक्षकांना ते आवडत आहेत. त्यात प्रामुख्याने ‘टकाटक २’ आणि ‘दगडी चाळ २’ चांगला व्यवसाय करीत आहेत. बहुपडदा चित्रपटगृहातून दिवसाला ४ ते ७ खेळ सुरू आहेत. ‘टकाटक २’ महाराष्ट्र आणि गोव्यात ३३३ चित्रपटगृहांत सुरू आहे, असे ‘रिलायन्स एन्टरटेन्मेंट’चे व्यवसायप्रमुख सुनील वाधवा यांनी सांगितले.

हिंदी असो वा मराठी ‘दर्जेदार आशय’ असलेल्या चित्रपटांनाच प्रेक्षक उचलून धरतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 

मंगेश कुलकर्णी, व्यवसायप्रमुख, ‘झी स्टुडिओ