बिग बॉस या रिअॅलिटी शोचे नवे पर्व लवकरच पाहायला मिळणार आहे. या शोमध्ये नेमके कोणते स्पर्धक येणार आहेत याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. अनेक प्रसिद्ध आणि वादग्रस्त व्यक्तींना या शोसाठी विचारले जाते. तृप्ती देसाई आणि राधे माँ यांनाही या शोसाठी विचारण्यात आले होते. पुढच्या महिन्यात याचे १० वे पर्व प्रेक्षकांसमोर येणार आहे. स्पर्धकांची यादी अंतिम टप्प्यात असताना एका प्रसिद्ध व्यक्तीने मात्र या शोमध्ये यायला नकार दिला आहे. दिल्लीस्थित कार्टूनिस्ट, लेखक आणि प्रेरणादायी वक्ता केव्ही गौतम यांना संपर्क केला होता.
केव्ही गौतम यांच्या चाहत्यांना या बातमीने नक्कीच आनंद झाला असेल. पण त्यांनी मात्र बिग बॉसमध्ये जाण्यास नकार दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी बिग बॉसकडून त्यांना विचारणा झाली होती असे म्हटले. यावेळी या घरात फक्त कलाकार किंवा नावाजलेल्या व्यक्तीच नाही तर सर्वसामान्य लोकही जाऊ शकतात. बिग बॉसचे हे घर सर्वांसाठी खुले आहे. यावेळी बिग बॉसमध्ये करण्यात आलेल्या या बदलामुळे प्रेक्षकांना हे पर्व पसंत पडणार की नाही हे तर काही दिवसात कळेलच.
राज्यभरात महिलांच्या हक्कांसाठी आक्रमक आंदोलने करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई लवकरच टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसण्याची शक्यता आहे. ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो नेहमीच त्यामधील स्पर्धकांमुळे आणि रंजकतेमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. आधीच वादात अडकलेल्या किंवा शोच्या सेटवर वाद निर्माण करु शकतील अशाच काही स्पर्धकांची निवड ‘बिग बॉस’मध्ये केली जाते. याच पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई बिग बॉसच्या आगामी सिझनमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. शनिशिंगणापूर मंदिरातील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश असो, वा हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेश या कारणांमुळे तृप्ती देसाई गेल्या काही दिवसांत सातत्याने चर्चेत राहिल्या आहेत. त्यामुळे टीआरपीचे गणित साधण्याच्यादृष्टीने तृप्ती देसाई यांना ‘बिग बॉस ९’साठी विचारणा करण्यात आल्याचे वृत्त आहे. आगामी पर्वात या कार्यक्रमात स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ, कुस्तीपटू कविता दलाल यांसारखी बहुचर्चित व्यक्तिमत्वे दिसण्याचीही शक्यता आहे.