छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे ‘इंडियन आयडल.’ आजवर या स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक गायकांचे शो ने संपूर्ण आयुष्य बदलले आहे. इंडियन आयडल ही स्पर्धा जिंकणारे गायक सध्या चांगलेच लोकप्रिय आहे. इंडियन आयडलचे पहिले पर्व गायक अभिजीत सावंतने जिंकले होते. त्यानंतर त्याला अनेक गाण्यांच्या ऑफर आल्या होत्या. यानंतर अभिजीत सावंतचे आयुष्य रातोरात बदलले होते. नुकतंच अभिजीत सावंतने सिनेसृष्टीत १७ वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने त्याने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
इंडियन आयडलचे पहिल पर्व जिंकल्यानंतर अभिजीत सावंत हे नाव घराघरात प्रसिद्ध झाले होते. काही दिवसांपूर्वी अभिजीतने सिनेसृष्टीत १७ वर्षे पूर्ण केली आहे. त्यानिमित्ताने त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक लहानसा रिल व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने त्याचे काही जुने फोटो वापरत एक व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओत त्याच्या इंडियन ऑयडल मंचावरील, पहिल्या रेकॉर्डिंगचे, फोटोशूटचे असे विविध फोटो पाहायला मिळत आहे. या व्हिडीओच्या मागे त्याचे प्रसिद्ध झालेले मोहब्बतें लुटाऊंगा हे गाणेही ऐकायला मिळत आहे. या गाण्याच्या शेवटी त्याने सर्वांचे आभार मानले आहे. गेल्या १७ वर्षांपासून साथ दिल्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद. माझे तुमच्या सर्वांवर प्रेम आहे, असे त्याने म्हटले आहे.
या व्हिडीओला अभिजीतने एक छान कॅप्शनही दिले आहे. “खरं आहे… वेळ लवकर निघून जाते. अगदी कालच इंडियन आयडॉलच्या मंचावर महाअंतिम सोहळ्यासाठी सादरीकरण करत होतो असं मला आता वाटतंय. माझ्या या प्रवासात मला साथ दिलेल्या प्रत्येकाचे मनापासून आभार. तुम्हाला खूप भरभरुन प्रेम”, असे अभिजीतने भावूक होत म्हटले आहे. अभिजीतने शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत.
इंडियन आयडल जिंकल्यानंतर मिळालेल्या पैशांचे काय केले? अभिजीत सावंत म्हणतो…
अभिजीत इंडियन आयडलचे पहिले पर्व जिंकल्यानंतर त्याला अनेक गाण्यांच्या ऑफर आल्या होत्या. पण त्यानंतर त्याला काम मिळत नसल्याचे त्याने म्हटले होते. सध्या तो लाइमलाइटपासून लांब असल्याचे पाहायला मिळते. मात्र तरीही तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो त्याच्या गाण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसतो.