‘टाइमपास ३’ हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. रवी जाधव दिग्दर्शित ‘टाइमपास’ चित्रपटाचे पहिले दोन भाग सुपरहिट ठरले. लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब ‘टाइमपास’ चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आला. या चित्रपटातील दगडूने त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. दगडू आणि प्राजूच्या लव्हस्टोरीवर प्रेक्षकांनीही भरभरून प्रेम केलं. आता पुन्हा एकदा प्रथमेश ‘टाइमपास ३’ च्या निमित्ताने प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने लोकसत्ता ऑनलाईनच्या ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’ला हजेरी लावली होती.
‘टाइमपास’ चित्रपटात दगडू-प्राजक्ताच्या नात्याप्रमाणेच साईबाबा आणि दगडूमधील केमिस्ट्रीही प्रेक्षकांनी पाहिली. दगडूची साईबाबांवर असलेली नितांत श्रद्धा आणि अपार भक्ती याचे दर्शन चित्रपटातून प्रेक्षकांना झाले. या चित्रपटातील त्याचा ‘आईबाबा आणि साईबाबाची शपथ’ हा डायलॉगही लोकप्रिय झाला होता. ‘टाइमपास ३’ चित्रपटातही दगडू आणि त्याची साईबाबांवर असलेली भक्ती हे समीकरण कायम आहे. चित्रपटातील इतर गाण्यांप्रमाणेच ‘साई तुझे लेकरू’ हे गाणंही सोशल मीडियावर हिट ठरत आहे. ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये प्रथमेशला त्याचे खऱ्या आयुष्यातील श्रद्धास्थान कोण आहे?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने अगदी दिलखुलासपणे उत्तर दिले.
हेही वाचा : “मी टाइमपास करत लिहित नसतो…” प्रियदर्शन जाधवने प्रथमेश परबसाठी लिहिलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
“टाइमपास चित्रपट केल्यापासून माझी साईबाबांवर श्रद्धा आहे. रवी सर साईबाबांचे भक्त आहेत. त्यांनी जेव्हा मला सांगितले की दगडूचीही साईबाबांवर नितांत श्रद्धा आहे. तेव्हापासूनच मी साईबाबांना मानतो. ‘टाइमपास ३’ चित्रपटातील ‘साई तुझं लेकरू’ गाणं चित्रित झाल्यानंतर मी शिर्डीला जाऊन आलो. ‘टाइमपास’ चित्रपटातील प्राजूच्या वाढदिवशी दगडू साईबाबांना तिच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, असं सांगतो. मला तो सीन शूट करताना असं जाणवलं की साईबाबांनी त्यांच्या डोळ्यांनी आशीर्वाद दिला आणि तो सीन हिट झाला”, असं प्रथमेश म्हणाला.
पुढे तो म्हणाला, “आईबाबा आणि साईबाबांव्यतिरिक्त मी गणपती बाप्पाला खूप मानतो. माझं नाव सुद्धा बाप्पााच्या नावावर आहे. लहानपणापासूनच माझी बाप्पाावर श्रद्धा आहे. मी रोज गणपती बाप्पाची पूजा करतो.”
हेही वाचा : वाघाची डरकाळी, रिक्षाचा हॉर्न अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संबंध काय? दिग्दर्शक रवी जाधव म्हणतात…
‘टाइमपास ३’ चित्रपटात दगडूच्या आयुष्यात नवीन मुलगी आलेली पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात दगडू आणि पालवीची लव्हस्टोरी प्रेक्षकांना दिसणार आहे. प्रथमेश परबसोबत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री ह्रता दुर्गुळे मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय चित्रपटात संजय नार्वेकर, भाऊ कदम, ओंकार राऊत, मनमीत पेम या कलाकरांनी भूमिका साकारल्या आहेत.