भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच स्त्री हास्य कलाकारांसाठी एका नवीन शोची निर्मिती करण्यात आली आहे. ‘क्वीन्स ऑफ कॉमेडी’ या पहिल्या महिला कॉमेडी शोचे प्रसारण ‘टीएलसी’ वाहिनीवरुन केले जाणार आहे. या शोद्वारे पहिल्यांदाच महिला हास्य कलाकारांना एक वैशिष्टपूर्ण मंच मिळणार असून स्पर्धात्मक वातावरणात पुरुष कलाकारांच्या तोडीने त्या प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत, अशी माहिती वाहिनीच्या सूत्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रातील पुरुष हास्य कलाकारांना स्पर्धा देण्यासाठी स्त्री हास्य कलाकारांना मंच देणारा नवीन कॉमेडी शो लवकरच ‘डिस्कव्हरी कम्युनिकेशन इंडिया’च्या ‘टीएलसी’ वाहिनीवरुन प्रसारित केला जाणार आहे. लाईफ स्टाईलसाठी प्रसिध्द असलेल्या ‘टीएलसी’ वाहिनीवरुन स्त्री हास्य कलाकारांना प्रोत्साहित करणारा ‘क्वीन्स ऑफ कॉमेडी’ हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्पर्धेचे स्वरुप असणाऱ्या या शोचे परीक्षण अभिनेत्री रिचा चड्डा, ‘एआयबी’ फेम हास्य कलाकार रोहन जोशी आणि कानीझ सुर्का करणार आहेत. याशिवाय वरुण ठाकूर या शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणार आहे. स्त्रिया जन्मजातच विनोदी स्वभावाच्या नसतात किंवा त्या आयुष्याकडे खुप गांभिर्याने पाहतात, अशी धारणा आपल्या समाजात आहे. त्यामुळे भारतीय विनोदी कलाकारांच्या वर्तुळात महिलांकडे पाहण्याची दृष्टी ‘क्वीन्स ऑफ कॉमेडी’ या शोमुळे बदलेले अशी भावना ‘डिस्कव्हरी कम्युनिकेशन इंडिया’चे बिझनेस हेड झुल्फिया वारीस यांनी व्यक्त केली. या शोमधून पहिल्यांदाच अभिनेत्री रिचा चढ्ढा छोटय़ा पडद्यावर पदार्पण करते आहे.

आपल्या समाजात महिलांकडून शांत, योग्य वर्तनाची आणि नेहमी सौम्यपणे वागावे अशी अपेक्षा केली जाते. आणि पुरुषांना आक्रमकपणे ठाम मतं मांडण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. त्यामुळेच विनोदाच्या क्षेत्रात महिलांचे प्रमाण फार कमी आहे. महिलांच्या प्रतिभेला व्यक्त होण्याची संधी देणारे मंच फार कमी आहेत. ‘टीएलसी’ने उचललेले पाऊल महत्वाचे असून अशा या शोचा भाग होताना आपल्याला अतिशय आनंद होत असल्याचे रिचाने सांगितले. २४ सप्टेंबरपासून प्रत्येक रविवारी रात्री १० वाजता हा कार्यक्रम दाखवण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tlc channel launched first female stand up comedy show in india
First published on: 30-07-2017 at 01:40 IST