|| रेश्मा राईकवार

दुसऱ्याच्या मनातला गुंता सोडवताना हळूहळू आपल्या मनातल्या निरगाठीही अलगद सुटत जातात. आपल्या दु:खाकडे आपण नव्याने पाहू लागतो. मनातली मरगळ संपून नवा ताजेपणा मिळतो, नवी उमेद मिळते. तापलेल्या उन्हानंतर बरसत्या धारा घेऊन येत सगळी धग निवून टाकणारा, आतून शांत करणारा तो हिरवा ‘जून’. याच अर्थाने मराठी प्रेक्षकांना आशय-विषयाच्या बाबतीतही ताजातवाना अनुभव देणारा हा ‘जून’ आहे. एकाच पद्धतीच्या नाट्यमय साच्यातील दृश्यमांडणीतून बाहेर काढणारा आणि प्रगल्भतेने आपला आशय मांडणारा असा हा चित्रपट आहे.

मैत्रीचे, प्रेमाचेही आपले आपले असे एक साचे तयार झाले आहेत की काय असं अनेकदा वाटून जातं. दोन ओळखीचे जीव भेटले काय किं वा दोन अभ्यागत भेटले काय ते क शा पद्धतीने पुढे जातील? त्यांच्यात नेमके  कसे बंध तयार होतील?, याचे आडाखे बांधायची आपल्याला एक सवयच जडलेली असते जणू… त्यांच्यातलं नातं ठरवायची, मग त्या नात्यांचा अर्थ लावायची कोण घाई असते आपल्याला. इथे मात्र हा चित्रपट पाहताना आपलं आडाखे बांधणं सुरू झालं तरी आजवर मराठीत पाहिलेल्या आपल्या चित्रपटीय अनुभवाला धक्का देण्याचं काम लेखक आणि दिग्दर्शक मंडळी करत राहतात. पहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला पहिला मराठी चित्रपट म्हणूनही त्याची दखल घेणं महत्त्वाचं आहे. वेबपटांची म्हणून एक वेगळी शैली सध्या पाहायला मिळते. त्याच शैलीला पुढे नेणाऱ्या या चित्रपटाची निखिल महाजन लिखित कथा खऱ्या अर्थाने आजच्या काळाला किं बहुना आजच्या पिढीच्या मानसिकतेला धरून लिहिली गेली आहे. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनाकलनीय घटना, चुका आणि त्यातून उमटलेल्या परिणामांचे गांभीर्य भोगताना अनेकदा जिवलगांकडूनच आपण नाकारले जातो. आपल्याला कोणी समजून घ्यावे ही किमान गरज पूर्ण होत नाहीच, मात्र पश्चाात्तापाच्या आगीत जळत राहून एका क्षणाला सगळंच संपवावंसं वाटण्याच्या सीमारेषेपर्यंत एखादा जीव हिंदकळत राहतो. एकाअर्थी आजच्या पिढीच्या सगळ्यात महत्त्वाच्या समस्येवर बोलणारा, दोन व्यक्तिरेखांच्या परस्पर संवादातून जगणे नव्याने उलगडणारा असा हा चित्रपट आहे. पुण्याहून औरंगाबादमध्ये आलेली नेहा (नेहा पेंडसे) आणि नापास झाल्यामुळे इंजिनीअरिंगचे एक वर्ष फु कट गेलेला नील (सिद्धार्थ मेनन) या दोघांच्याही भूतकाळात असं काही घडून गेलं आहे, ज्याचा सल त्यांना वर्तमानातही डागण्या देतो आहे. जगणे सुसह््य होण्याऐवजी मृत्यू कधी येईल याची मनातल्या मनात वाट पाहणारे हे दोघेही योगायोगाने भेटतात. नेहाला औरंगाबाद दाखवण्याच्या निमित्ताने त्यांच्यातील संवाद सुरू होतो. हळूहळू एक बंध तयार होत जातो. एक मेकांच्या दु:खाची चाहूल लागते. आणि दुसऱ्याला दु:खातून बाहेर काढताना पहिल्याला आपल्याच प्रशद्ब्रांची उत्तरं सापडत जातात, अशी या चित्रपटाची सर्वसाधारण कथा आहे.

या मूळ कथेला भावनांचे अनेक पदर आहेत. नव्या शहरात जाऊन शिकण्याची ओढ, हॉस्टेल असो वा कॉलेज प्रस्थापितांमध्ये राहण्यासाठी करावी लागणारी धडपड, कोणाची काढली जाणारी छेड, नकळतपणे त्याच्या मनातील न्यूनगंड वाढवण्यास कारणीभूत ठरणं हा नीलच्या आयुष्यातला भाग आहे. नील आणि वडिलांमधील विसंवाद हाही एक महत्त्वाचा धागा आहे. त्या तुलनेत नेहाची व्यक्तिरेखा बऱ्यापैकी थेट, सरळ, सुस्पष्ट अशी आहे. तिचा स्वतंत्र, धीट, मनमोकळा वावर, पेहराव याला समाजाकडून लावण्यात येणारं स्वैराचाराचं लेबल आपल्याला नवं नाही. पण यापलीकडे जात आजची पिढी खोलवर जाऊन प्रत्येक गोष्टीचा विचार करते, आपल्याबरोबर इतरांच्या समस्याही जाणून घेण्याचा प्रयत्न करते. चांगल्याला दाद देणं आणि वाईटाला भिडणं दोन्ही ते मनापासून करतात, अशा कितीतरी गोष्टी लेखक-दिग्दर्शकाने यात सहजपणे दाखवून दिल्या आहेत. सकस व्यक्तिरेखा, मोजके च संवाद आणि त्याला वास्तवदर्शी चित्रणाची जोड यामुळे ‘जून’ ही परिकथा ठरत नाही, अवास्तव वाटत नाही. त्याचं श्रेय लेखकाला अंमळ जास्त असलं तरी सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती या दिग्दर्शकद्वयीने के लेली सहज मांडणीही तितकीच प्रभावी ठरते.

अभिनेत्री नेहा पेंडसेला खऱ्या अर्थाने इतक्या सुंदर भूमिके त पाहण्याची संधी या चित्रपटाने दिली आहे. ग्लॅमरस आणि आत्मविश्वासाने वावरणारी नेहा आपली चूक आठवली की मात्र कोसळून पडते. आपलं दु:ख सांगताना नीलच्या खांद्यावर डोकं  ठेवणारी नेहा त्याच्या आयुष्यातील विसंवाद दूर करण्यासाठीही जाणीवपर्वूक प्रयत्न करते. ही व्यक्तिरेखा जणू नेहा पुरेपूर जगली आहे. सिद्धार्थनेही नीलची व्यक्तिरेखा तितक्याच समरसतेने साकारली आहे. निकीच्या भूमिकेतील अभिनेत्री रेशम श्रीवर्धनचाही इथे खास उल्लेख करायला हवा. निकीची व्यक्तिरेखा चित्रपटात अर्धवट सोडल्यासारखी वाटते, त्यामुळे सुंदर अभिनय असूनही तिला हवा तसा वाव मिळालेला नाही. नीलच्या वडिलांची भूमिका करणाऱ्या किरण करमरकर यांनीही आपली भूमिका चोख वठवली आहे, पण अर्थात वडील-मुलाचे नाते हा या कथानकातील महत्त्वाचा भाग असूनही तो पुरेसा फु लवता आलेला नाही. जितेंद्र जोशीचा छोटेखानी वावरही प्रसन्न करणारा आहे, तीच गोष्ट संस्कृती बालगुडेच्या बाबतीतही म्हणता येईल. इतक्या अलवार भावनाट्याला तितके च हळुवार, श्रवणीय संगीत देण्याचा प्रयत्न शाल्मली खोलगडेने के ला आहे. आशय, लेखन-दिग्दर्शन, अभिनय सगळ्याच बाबतीत सकस असणारा हा चित्रपट एक नवा अनुभव देऊन जातो.

 

जून

दिग्दर्शक – सुहृद गोडबोले, वैभव खिस्ती

कलाकार – नेहा पेंडसे, सिद्धार्थ मेनन, जितेंद्र जोशी, संस्कृती बालगडे, रेशम श्रीवर्धन, किरण करमरकर, नीलेश दिवेकर.