अभिनेता सलमान खानच्या आगामी ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आता संपूर्ण टीम चांगलेच प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासूनच ‘ट्युबलाइट’ या नावाविषयी अनेकांनाच कुतूहल वाटत होतं. त्यातही सलमान ‘ट्युबलाइट’च्या भूमिकेत दिसणार म्हटल्यावर अनेकांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली. आता खुद्द सलमानच या चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी सांगत आहे.

‘सलमान खान फिल्म्स’ या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये सलमान त्याच्या या भूमिकेविषयी बोलताना दिसतोय. ‘ट्युबलाइट हे नाव अशासाठी ठेवण्यात आलं आहे की जेव्हा ट्युबलाइट आपण सुरु करतो तेव्हा ती सुरु होण्यासाठी काही वेळ घेते. पण, एकदा का ती सुरु झाली की सर्वकाही प्रकाशमान करते’, असं म्हणत सलमान त्याच्या भूमिकेबद्दल सांगत आहे. त्याच्यासोबतच दिग्दर्शक कबीर खानही सलमानच्या भूमिकेविषयी सांगत आहे. सहसा कोणताही विषय थोडा उशीराने उमगणाऱ्या लोकांना ‘ट्युबलाइट’ असं म्हटलं जातं, याचाच संदर्भ घेत आणि शालेय जीवनातील काही प्रसंगांचा आधार घेत कबीरने या चित्रपटामध्ये सलमानचं पात्र रंगवून घेतलं आहे.

या व्हिडिओमध्ये चित्रीकरणादरम्यानची काही दृश्यही पाहायला मिळत आहेत. या आगामी चित्रपटात सलमान ‘लक्ष्मण सिंग बिश्त’ या भूमिकेतून झळकणार आहे. सध्या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी पाहता सलमानच्या अभिनयाची एक सुरेख बाजू पाहायला मिळत आहे. या व्हिडिओच्या शेवटी सलमानचं वक्तव्य चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढवत आहे. ‘या चित्रपटात मी आनंदात आणि दु:खात जितका रडलोय, माझा विश्वास आहे की प्रेक्षक त्याहीपेक्षा जास्त रडतील अर्थात त्यात आनंदाश्रूही असतील’, असं दबंग खान म्हणताना दिसत आहे.

VIDEO : तिला ‘आय लव्ह यू’ म्हणताच कतरिनाने रणबीरला लगावली चपराक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलमा खान आणि सलमान खान यांची निर्मिती असलेला हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान आणि सोहेल ही रिअल लाइफ भावांची जोडी जवळपास सात वर्षांनंतर स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे ही ईदची ‘ट्युबलाइट’ तिकीटबारीवर किती उजेड पाडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.