टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तुनिषाच्या आईच्या तक्रारीवरून तुनिषाचा प्रियकर व सहकलाकार शिझान खानला पोलिसांनी अटक केलेली आहे. काल न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली. दरम्यान पोलीस तपासात आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे की, आत्महत्या करण्याअगोदर तुनिषाचं आणि शिझान खान यांच्यात १५ मिनिटं संभाषण झालं होतं.

शिझान याने तुनीषासोबत झालेल्या संभाषण मोबाईलमधून नष्ट का केले याचा तपास करण्यासाठी पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. शिझान आणि तुनिषा यांच्यामध्ये ‘व्हाट्सअप’वर नेमके काय संभाषण होते? याबाबत तपास करत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

त्या १५ मिनिटांमध्ये असं काय घडलं? –

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना अनेक नवनवीन माहिती मिळत आहे. आत्महत्या करण्याच्या अगोदर तुनिषाचं शिझानशी बोलणं झालं होतं. मात्र त्या १५ मिनिटांमध्ये असं काय घडलं, ज्यानंतर तुनिषाने एवढा टोकाचा निर्णय घेतला.

पोलिसांनी सांगितले की, प्रत्येकवेळी शिझानला आम्ही जेव्हा विचारपूस करतो तेव्हा तो रडायला लागतो, त्याने आतापर्यंत सांगितले नाही की त्यांच्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं होतं. तर, प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार जेवणाच्या सुट्टीच्या वेळात दोघांमध्ये बोलणं झालं, ज्यानंतर शिझान दरवाजा जोरदार आपटून खोलीतून बाहेर पडला होता, त्यानंतर तुनिषा खोलीत आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळली होती.

शिझान खान मागच्या चार दिवसांपासून पोलीस कोठडीत होता. पोलिसांनी त्याची चौकशी केली, पण तो वारंवार त्याचा जबाब बदलत आहे. तसेच आतापर्यंत त्याने कोणतीही माहिती दिलेली नाही, त्यामुळे पोलिसांनी त्याची कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. कोर्टाने पोलिसांची मागणी मान्य करत शिझानची कोठडी २ दिवसांनी वाढवली आहे.

२४ डिसेंबर रोजी अलिबाबा मालिकेच्या सेटवर तुनिषाने शिझानच्या मेकअप रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. यानंतर तुनिशाच्या आईने शिझानवर तिच्या मृत्यूला प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची तातडीने दखल घेत पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे.