छोटा पडदा घराघरात ठाण मांडून बसलेला असतो. घरातील प्रत्येकाचे मन जिंकायचे असेल तर त्यांना आवडेल ती प्रत्येक गोष्ट आपल्या मालिकांमधून, रिअ‍ॅलिटी शोजमधून दाखवलीच पाहिजे या नियमाप्रमाणे प्रत्येक सण, छोटी-मोठी घटना छोटय़ा पडद्यावर साजरी केली जाते. ज्याला धुळवडही अपवाद नाही. वेगवेगळ्या ढंगाचे पांढरे कपडे घालून रंगपंचमी साजरी करणारे कलाकार पूर्वी ज्या त्या मालिकांमध्ये दिसायचे. मात्र यंदा हाही ट्रेंड बदलला असून प्रत्येक वाहिनीने एखाद्या पुरस्कार सोहळ्यांप्रमाणेच धुळवडीचेही ‘इव्हेंट’ केले आहेत.
‘पवित्र रिश्ता’च्या देशमुख घरात मराठी म्हणून गणपती यायलाच पाहिजे. यच्चयावत सगळ्या पंजाबी मालिकांमधील सूनांनी ‘करवा चौथ’ केलाच पाहिजे. तसंच, प्रत्येक मालिकेत धुळवडही साजरी व्हायला पाहिजे तर त्यांच्या कथानकातही बदल करावे लागतात. आणि मग ती धुळवड त्या त्या वाहिनीवरच्या काही मालिकांपुरती मर्यादित राहते, कारण एखाद्या मालिकेत गंभीर कथानक सुरू असेल तर त्यात रंगपंचमी कशी साजरी करता येणार? त्यापेक्षा या सगळ्यावर काट मारत वाहिन्यांनी आपल्या सगळ्याच कलाकारांना एकत्र घेऊन धुळवड सोहळे साजरे के लेत. या धुळवड इव्हेंटचा शुभारंभ या वेळी ‘कलर्स’कडून झाला आहे. ‘बेइंतिहा जजबात के रंग’ अशा मोठय़ा विचित्र नावाच्या या धुळवडीत त्यांची ‘बालिकावधू’, ‘रंगरसिया’, ‘बेइंतिहा’, ‘बानी : इश्क दा कलाम’ अशा सगळ्याच मालिकांचे कलाकार एकत्र येऊन नाचले-गायले आहेत. त्यांच्याबरोबर ‘रागिणी एमएमएस २’ची नायिका ‘बेबी डॉल’ सनी लिऑनने ताल धरला आहे. एकीकडे ‘कलर्स’ने आपल्याच कलाकारांना घेऊन वेगवेगळे कार्यक्रम केले आहेत तर स्टार प्लसने ‘फ्रेम प्रॉडक्शन’ या निर्मिती संस्थेला हाताशी धरत ‘मस्ती गुलाल की’चा रंग जमवला आहे.
‘स्टार प्लस’ची ही धुळवड पाण्याविना होणार असल्याने त्यांचे गाजलेले कलाकार एलईडी लाइट्सच्या मदतीने नाचगाण्याचे रंग उधळणार आहेत. ‘बलम पिचकारी..’ दूर ठेवा आणि पाणी वाचवा हा त्यांच्या धुळवड इव्हेंटचा संदेश आहे. झी टीव्हीचा ‘होली महोत्सव’ तर तब्बल तीन तासांचा आहे. ‘झी होली महोत्सव : लडकपन के सुहाने रंग’ नावाचा हा शो वेगळा आहे, कारण या शोमध्ये खास बनारसी पद्धतीने धुळवड खेळली जाणार आहे. यानिमित्ताने, देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने धुळवड कशी खेळली जाते हेही प्रेक्षकांना पाहता येते आणि ब्रॉडकास्टर म्हणून आमचाच विविध आशय एकाच कार्यक्रमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधीही आम्हाला मिळते. म्हणून या शोचे आयोजन केल्याचे झी टीव्हीचे कार्यक्रमप्रमुख नमित शर्मा यांनी म्हटले आहे. तर हाच दृष्टिकोन कायम ठेवत लाइफ ओके आणि सब टीव्ही या दोन्ही वाहिन्यांनी धुळवडीचा ‘इव्हेंट’ साजरा केला आहे. ‘लाइफ ओके’ वाहिनी या भाऊगर्दीत नवी असल्याने त्यांनी आपल्या होळी इव्हेंटमध्ये रंग भरण्यासाठी यो यो हनी सिंगला पाचारण केलं आहे. ‘होली है..तो लाइफ ओके है’ नावाने होणाऱ्या या जंगी कार्यक्रमात हनीच्या पंजाबी गाण्यांना कॉमेडी क्वीन भारती सिंग तिच्या स्टाइलमध्ये भोजपुरी रॅप गाणी गाऊन रंगीबेरंगी जुगलबंदी साजरी करणार आहे. ‘लाइफ ओके’च्या सर्वात गाजलेल्या मालिकांमध्ये ‘सावधान इंडिया’ आणि ‘शपथ’ ही दोन नावे प्रामुख्याने समोर येतात. त्यामुळे नेहमी गुन्हेगारांच्या मागावर असणाऱ्या ‘रील’ पोलिसांना वाहिनीने या धुळवडीत हनी सिंगबरोबर सामील करून घेतले आहे. तर आजवर कौटुंबिक विनोदी करमणुकीचा बाज सांभाळणाऱ्या सबनेही पहिल्यांदाच आपल्या कुटुंबातली सगळ्यात लोकप्रिय जोडी अर्थात ‘तारक मेहता का उलटा चश्मा’चे दया आणि जेठा यांच्या हातात ‘सब की फॅमिली होली’चे रंग दिले आहेत. सोनी टीव्हीने सध्या ‘सीआयडी’वर आपले लक्ष केंद्रित केले असल्याने या वेळची धुळवड ही एसीपी प्रद्युम्न, दया, अभिजित, फ्रेडी, साळुंके आणि तारिका यांच्याबरोबरच साजरी करायची आहे. ‘सीआयडी’ आणि रिअ‍ॅलिटी शो ‘बूगी वूगी’ वगळता एकाच मालिकेत धुळवड खेळली जाणार आहे ती ‘जी ले जरा’ या मालिकेत. तर ‘एक नयी पेहचान’मधले मोदी कुटुंब होळीची पूजा करण्यासाठी एकत्र येणार आहे.छोटय़ा पडद्यावरच्या या धुळवड इव्हेंटची यादी पाहिली तर सहज लक्षात येईल की, प्रत्येक वाहिनीने आपल्या सगळ्याच कलाकारांना एका माळेत गुंफून प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी या धुळवड इव्हेंटचा उपयोग केला आहे. होळी आणि रंगपंचमी ही संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने लोकप्रिय असल्याने त्याचा इव्हेंट हा वाहिन्यांसाठी आशयात्मक आणि ‘अर्था’त्मक ठरला आहे. या कार्यक्रमांसाठी ‘सर्फ  एक्सेल’, ‘आयडिया’सारख्या मोठमोठय़ा कंपन्यांनी प्रायोजकत्व दिले असल्याने वाहिन्यांनी खरोखरच या धुळवड इव्हेंटचा यथार्थ उपयोग करून घेतला आहे..