अभिनेत्री, लेखिका ट्विंकल खन्ना आता निर्मातीच्या भूमिकेतही दिसणार आहे. तिच्या विनोदबुद्धीचा प्रत्यय तर सतत येत असतो. लवकरच तिची पहिली निर्मिती असलेला ‘पॅडमॅन’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार, सोनम कपूर आणि राधिका आपटे यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा एक चरित्रपट आहे. या सिनेमाबद्दल बोलताना ट्विंकल म्हणाली की, ‘या सिनेमाशी जोडले गेल्याचा मला अभिमानच आहे. मासिक पाळीवर आपल्याकडे अजूनही एक लपवून ठेवण्याची गोष्ट याच नजरेने पाहिले जाते. या सिनेमात मासिक पाळीबद्दल जनजागृती घडवून आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.’ हा सिनेमा अरुणाचलम मुरुगानाथम यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. अरुणाचलम यांनी स्वस्त आणि गावातल्या महिलांपर्यंत पोहोचतील, असे सॅनिटरी नॅपकिन बनवले. सध्या या सिनेमाचे चित्रिकरण इंदौरमध्ये सुरु आहे.

मंगळवारी एका कार्यक्रमादरम्यान ट्विंकलने सांगितले की, ‘सध्या या सिनेमाचे चित्रिकरण फार चांगल्या पद्धतीने सुरु आहे. अरुणाचलम हेही चित्रिकरणादरम्यान सेटवर उपस्थित असतात. हा सिनेमा समाज ज्या गोष्टींवर आज मोकळेपणाने बोलायला धास्तावतो अशा गोष्टींबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करेल. आर बल्की या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत.’

काही दिवसांपूर्वी टीव्हीएफचे सीईओ अरुणाभला ट्विंकलने खडे बोल सुनावत म्हटले होते की, ‘महिलेला बेडरुममध्ये ‘सेक्सी’ बोलणे योग्य असले तरी सार्वजनिक ठिकाणी तिला ‘सेक्सी’ संबोधणे पूर्णपणे चुकीचे आहे. महिलेचा आदर हा केलाच गेला पाहिजे.

टीव्हीएफचा सीईओ अरुणाभनने वृत्तपत्राच्या मुलाखतीत म्हटले होते की, ‘मला मुली आवडतात. त्यामुळे मला ज्या मुली आवडतात त्यांना मी ‘सेक्सी’ म्हटलं तर त्यात काय चुकलं? एखाद्या मुलीचे कौतुक करणे चुकीचे आहे का?’ ट्विंकलने अरुणाभच्या या वक्तव्यावर उत्तर देताना आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले की, ‘तो दोषी आहे निर्दोष हे तर काळच ठरवेल. पण आता त्याचे नाव समोर आले की एक धोक्याची घंटा वाजल्यासारखी वाटते. अगदी तशीच जशी एखाद्या नेत्याची गाडी लाल दिव्याची पर्वा न करता वर्दळीच्या रस्त्यावरुन जात असते. त्या नेत्याला नियम आणि न्याय व्यवस्था हे त्याच्यासाठी नसून दुसऱ्यांसाठी आहेत असेच वाटत असते. अगदी असेच तुझे नाव ऐकले की वाटते.’