बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालशी लग्न करणार असल्याचा खुलासा केला. आता उदित नारायण यांनी मुलाच्या लग्न करण्याच्या निर्णयावर वक्तव्य केले आहे.
नुकताच उदित नारायण यांनी ‘दैनिक भास्कर’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना आदित्यच्या लग्नाविषयी विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी, ‘मी गेल्या अनेक वर्षांपासून श्वेताला ओळखत आहे. पण फक्त आदित्यची एक चांगली मैत्रीण म्हणून. मला माहिती नव्हते ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत. एक दिवस आदित्य माझ्याकडे आला आणि म्हणाला की त्याला श्वेताशी लग्न करायचे आहे. त्यावर मी त्याला म्हणालो की जर भविष्यात काही झाले तर आई-वडिलांना दोष देऊ नकोस’ असे म्हटले.
View this post on Instagram
पुढे ते म्हणाले, ‘आदित्यच्या लग्नाची तयारी सुरु आहे. त्याचे लग्न आम्हाला धूमधडाक्यात करायचे आहे. पण करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ते शक्य नाही. जर १ डिसेंबर पर्यंत सर्व काही ठिक झाले तर मुंबईमध्ये आदित्यचे लग्न असेल. मी आदित्यच्या लग्नात काही लोकांना बोलवू इच्छितो. पण सरकारच्या निर्णया विरोधात मी जाणार नाही.’
‘शापित’ चित्रपटाच्या सेटवर आदित्य आणि श्वेताची ओळख झाली होती. सुरुवातीला त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते होते. गेल्या १० वर्षांपासून ते दोघे एकमेकांना ओळखतात. आदित्य हा एक गायक आणि अभिनेता आहे. त्याने रिअॅलिटी शो इंडियन आयडलचे सूत्रसंचालन केले आहे. आदित्यची गर्लफ्रेंड श्वेता ही एक अभिनेत्री आहे. तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. येत्या डिसेंबर किंवा नोव्हेंबर महिन्यात ते दोघे लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जाते.