हिंदी चित्रपटांमध्ये ‘सिक्वल’चा मोह जसा निर्मात्यांना आवरत नाही. तसा मालिकांमध्ये दहा-वीस वर्षांच्या उडय़ा घेत एकेक ‘पर्व’ वाढवण्याचा मोह वाहिन्यांना आवरत नाही. एखादीच मालिका लोकप्रिय होते. त्यामुळे तिच्या लोकप्रियतेवर जितके दिवस घालवता येईल तितके दिवस घालवण्याचा फंडा वाहिन्यांनी रूढ केला आहे. मात्र त्यासाठी मालिका ताणताना ज्या काही अतिरेकी गोष्टी केल्या जातात त्या पाहून कंटाळलेल्या प्रेक्षकांनी या मालिकांना बाहेरचा रस्ता दाखवायला सुरुवात केली आहे. गेली तीन र्वष ‘झी टीव्ही’वर सुरू असलेली ‘कुबूल है’ ही मालिका या आठवडय़ात निरोप घेते आहे. मालिका वाढवण्यासाठी किती ताणावी? याचा आदर्श नमुना ठरलेल्या या मालिकेतील नायिकेने आत्तापर्यंतच्या तीन पर्वामध्ये दहा विविध नायकांबरोबर काम केले आहे.

हिंदी मालिकांवर आजही राजस्थानी, गुजराती आणि पंजाबी संस्कृतीचा पगडा आहे. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी ‘झी’ टीव्हीवर जेव्हा मुसलमान संस्कृतीचे चित्रण करणारी ‘कुबूल है’ मालिका दाखल झाली तेव्हा या मालिकेबद्दल लोकांना प्रचंड आकर्षण होते. आधुनिक काळात मुसलमान संस्कृतीत काही बदल झाले आहेत का? त्यांचे विचार, राहणीमान, प्रथा-परंपरा या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांसाठी नवीन असल्याने मालिकेने थोडय़ाच वेळात पकड घेतली. मात्र चांगला टीआरपी मिळवूनही मालिकेतील नायक काही ना काही कारणांनी सतत बदलत गेले. सुरभी ज्योती ही या मालिकेची नायिका मात्र पहिल्यापासून कायम आहे. तिच्याबरोबर पहिल्यांदा भूमिकेत होता तो अभिनेता करण सिंग्र ग्रोवर. करण हिंदी चित्रपटांमध्ये व्यग्र झाल्याने त्याने मालिका सोडली. जेव्हा जेव्हा मालिका रेंगाळली तेव्हा त्याच्या कथानकात मोठे बदल करून नवीन र्पव दाखल करण्यात आली. तरीही मालिकेला पहिल्यासारखी प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. आत्तापर्यंत या मालिकेची तीन र्पव झाली असून त्यात सुरभीने एक नव्हे दहा नायकांबरोबर काम केले आहे. आत्ता बस!.. असा तिच्या तोंडून सूर निघणार तेवढय़ात निर्मात्यांनी मालिकाच बंद करण्याचा निर्णय घेतल्याने सुरभीने सुटकेचा श्वास घेतला आहे. मात्र अशा प्रकारे वाढवण्यात आलेली ‘कु बूल है’ ही पहिली मालिका नाही.

‘झी’ टीव्हीवरच दीर्घकाळ चाललेल्या ‘पवित्र रिश्ता’चेही असेच कडबोळे करण्यात आले होते. २००९ साली ही मालिका सुरू झाली होती. त्याही मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या सुशांत सिंग राजपूतने चित्रपटांचा मार्ग चोखाळल्यावर मालिकेचे नायक बदलत गेले. नायिका अंकिता चौधरी मात्र शेवटपर्यंत कायम राहिली. सहा र्वष चाललेल्या या मालिकेनेही अपघात, पुनर्जन्म न जाणे किती अतार्किक गोष्टींचा आधार घेत चार वेगवेगळी र्पव रंगवली. मात्र कंटाळलेल्या प्रेक्षकांनी मालिकेचे नावही घेणे सोडून दिले तेव्हा कुठे मालिका निर्मात्यांनी बंद झाली. ‘कलर्स’वरची ‘मधुबाला’ ही नंबर वन असलेली मालिकाही त्यांना बंद करावी लागली. आणि आता याच वाहिनीवरची एकता कपूरची निर्मिती असलेली ‘मेरी आशिकी तुमसे ही’ मालिकासुद्धा लवकरच बंद होणार आहे.