डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ‘वसंतोत्सव’ कार्यक्रमात गायक विनायक जोशी यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या त्या ज्येष्ठ गायक-संगीतकार व्यक्तीला व्यासपीठावर आमंत्रित केले आणि गाणे सादर करण्याची विनंती केली. त्यांनीही कोणतेही आढेवेढे न घेता व्यासपीठावरून त्यांनी स्वत: गायलेले, संगीतबद्ध केलेले आणि आजही तेवढेच लोकप्रिय असलेले ‘आली कुठूनशी कानी टाळ , मृदुंगाची धून.’ हे गाणे सादर केले आणि अवघा श्रोतृवर्ग ‘विठ्ठल’मय होऊन गेला. वयाच्या ८२ व्या वर्षांतही ज्या आवाजाने रसिकांना भारून टाकले ते ज्येष्ठ गायक-संगीतकार वसंत आजगावकर आजच्या ‘पुनर्भेट’चे मानकरी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज जे वयाच्या ४५ ते ५० शीत आहेत त्यांना आजगावकर यांनी गायलेली ‘आली कुठूनशी’ आणि ‘स्मरा स्मरा हो दत्तगुरू’ ही दोन गाणी नक्कीच आठवत असतील. आकाशवाणीच्या ‘मंगल प्रभात’ या कार्यक्रमात आजगावकर यांची अन्य गाणीही नेहमी वाजायचीच पण ही दोन गाणी विशेष वाजायची. या दोन गाण्यांची लोकप्रियता आजही तसूभर कमी झालेली नाही. रसिकांच्या मनात आणि गळ्यात या दोन गाण्यांनी अढळ स्थान प्राप्त केले आहे.

‘एचएमव्ही’ कंपनीने काढलेल्या आपल्या ध्वनिमुद्रिका व गाणी याबाबत बोलताना आजगावकर म्हणाले, ‘‘आकाशवाणीवरून त्या काळात मराठी भावगीते/भक्तिगीते प्रसारित होत असत. श्रोत्यांकडूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळायचा. आजही लोकप्रिय असलेली अवीट गोडीची अनेक मराठी भावगीते पहिल्यांदा आकाशवाणीवरूनच सादर झाली होती हे विसरून चालणार नाही. आकाशवाणीवरून मी गायला लागलो. माझे नाव व प्रसिद्धीही झाली होती. त्यातून १९६२ मध्ये मला ‘एचएमव्ही’ कंपनीकडून बोलावणे आले. मी संगीतबद्ध केलेली दोन गाणी त्यांना पसंत पडली होती. त्यांनी त्याच्या ध्वनिमुद्रिका काढल्या. माणिक वर्मा यांनी गायलेल्या या दोन्ही गाण्यांचे कवी मधुकर जोशी आहेत. ‘हात धरी रे हरी पाहा पण करात माझ्या वाजे कंकण’ आणि ‘पाषाणातून वेडय़ा का तू बघसी रे श्रीराम अंतरी आहे आत्माराम’ ही दोन गाणी ‘एचएमव्ही’ने केली. पुढे माझ्यासाठी ‘एचएमव्ही’चे पर्व सुरू झाले. माझ्या आवाजातील ‘हिरवे पिवळे तुरे उन्हाचे’, ‘भुलविलेस साजणी तू बिलोल लोचनी’ या दोन गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका त्यांनी  काढल्या. ही गाणीही लोकप्रिय झाली. ‘आली कुठूनशी’ आणि ‘स्मरा स्मरा हो दत्तगुरू’ ही गाणी आजही कुठे गेलो तरी म्हणण्याचा आग्रह होतो. कार्यक्रमातून तर या गाण्यांची खास फर्माईश असतेच असते.

आजगावकर मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील शिरोडा गावाजवळील ‘आजगाव’चे. जन्माने ते गिरगावकर आणि नंतर डोंबिवलीकर. त्यांचे शालेय शिक्षण डोंबिवली लोकल बोर्डाच्या शाळेत व ‘स. वा. जोशी हायस्कूल’मध्ये झाले. पुढे रुईया महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी मिळविली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला न्यू कस्टम हाऊस येथे ‘लिपिक’ म्हणून तर नंतर ‘सेंच्युरी रेयॉन’मध्ये ‘रिसर्च केमिस्ट’ म्हणून दीर्घकाळ नोकरी केली व तेथूनच ते सेवानिवृत्त झाले. घरी आई-वडील दोघांनाही गाण्याची आवड होती. त्यामुळे गाण्याचा संस्कार लहानपणीच त्यांच्यावर झाला. पं. बेहेरे बुवा यांचे शिष्य पं. एस. के. अभ्यकंर यांच्याकडे ते शास्त्रीय संगीत शिकले. शास्त्रीय संगीत शिकत असले तरी तो काळ मराठी भावगीतांचा सुवर्णकाळ होता. त्यामुळे शास्त्रीय संगीत शिकत असतानाच ते भावगीत, सुगम संगीतही गात होते. नोकरीच्या निमित्ताने सुरुवातीला दररोज डोंबिवली ते मुंबई असा त्यांचा प्रवास व्हायचा. लोकल ट्रेनमध्ये लेखक शं.ना. नवरे, प्रभाकर अत्रे, नाटय़समीक्षक वा. य. गाडगीळ असा ग्रुप होता. गाडीतही आजगावकर गाणी (भावगीते) म्हणत असत. एकदा वा. य. गाडगीळ यांच्या घरी त्यांचा भावगीत गाण्यांचा कार्यक्रम झाला. त्यानंतर त्यांचे गाण्यांचे जाहीर कार्यक्रम सुरू झाले. पुढे १९५८ मध्ये आजगावकर यांनी आकाशवाणीसाठी ‘ऑडिशन’ दिली. त्यात यशस्वी झाल्यानंतर ते आकाशवाणीचे मान्यताप्राप्त गायक झाले. आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक गाणी गायली. विशेष म्हणजे मराठी भावगीतं – भक्तिगीतांबरोबरच आकाशवाणी मुंबई व पणजी केंद्रासाठी त्यांनी कोकणी गाणीही गायली आहेत. भावगीताकडे जास्त ओढा असल्याने व ती गाणी, कार्यक्रम करायला लागल्याने आजगावकर यांचे शास्त्रीय संगीत मागे पडले. त्यांचे गुरू पं. अभ्यंकर यांनीही त्यांना ‘तुझा आवाज भावगीतासाठीच योग्य असल्याचे सांगून तू भावगीतच गा’ असा सल्ला त्यांना दिला आणि तो त्यांनी शीरोधार्ह मानला.

आजगावकर यांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे भावगीत व भक्तिगीत गायनाबरोबरच त्यांनी विविध प्रकारचे पंधरा नवे कार्यक्रम सादर केले.  मराठी गीतरामायण (गदिमा), हिंदी गीतरामायण (पं. रुद्रदत्त मिश्रा) ‘गीत महाभारत’ (डॉ. वा. शं. देशपांडे), ‘झेंडूची फुले’ (आचार्य अत्रे), ‘मर्ढेकरांची कविता-एक नादानुभव’, तुलसीदास, कबीर, सूरदास, मीराबाई यांच्या रचनांवरील ‘सन्तो की बानी’, ‘गीत शिवायन’ (मधुकर जोशी), ‘गीत दत्तात्रय’ (कवी सुधांशु),स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कविता आणि जीवनदर्शन घडविणारा ‘सावरकर दर्शन’, ‘श्रीरामचरितमानस’ (संत तुलसीदास), विंदांच्या कवितांवरील ‘विंदांची प्रेमगाणी’, संत रामदास यांच्या विविध रचनांवर आधारित ‘रामदास म्हणे’ या आणि आणखी अन्य काही कार्यक्रमांचा समावेश आहे. मुंबई व महाराष्ट्रासह देशभरात आणि विदेशातही त्यांनी हे कार्यक्रम सादर केले.

विविध काव्यविषयक किंवा संतांच्या रचना-अभंग कार्यक्रमांविषयी त्यांनी सांगितले, मराठी कविता आणि संतांच्या रचना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हा या सगळ्यामागील उद्देश होता आणि त्यात यश मिळाले. हे सगळे करत असताना मला स्वत:ला खूप समाधान मिळाले. त्यानिमित्ताने अभ्यास, वाचन झाले आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नवनिर्मितीचा, सृजनशीलतेचा आनंद मिळाला. भावगीत गायन व सुगम संगीत, जाहीर कार्यक्रम यातून शास्त्रीय संगीतासाठी मी पाहिजे तेवढा वेळ देऊ शक लो नाही. त्यातून ते गाणे मागे पडले आणि शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करू शकलो नाही, अशी खंतही आजगावकर यांनी बोलून दाखविली.

पत्नी सुजाता, निनाद व कौस्तुभ ही दोन मुले, सुना व नातवंडे असा त्यांचा परिवार, आजगावकर यांचा गाण्याचा वारसा त्यांचा मोठा मुलगा निनाद याने पुढे सुरू ठेवला आहे. वाचनाची आवड असल्याने विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन हा त्यांचा सध्याचा विरंगुळा आहे. सुधीर फडके यांच्या गायकीवर आधारित व त्यांच्या गायकीचे रसग्रहण करणारा ‘बाबूजी-एक सुंदर स्वरयात्रा’ हा त्यांनी बसविलेला सध्याचा नवा कार्यक्रम. सतत काही ना काही नवीन करत राहणे त्यांना आवडते. त्यामुळे या वयातही ते कार्यक्रमातून व्यग्र असतात.

आजवरच्या प्रवासात रसिकांचे अमाप प्रेम लाभले आणि आजही  त्याचा अनुभव घेत आहे. माझ्या कुवतीनुसार मराठी भाव/सुगम संगीतात मला जे काही थोडेफार करता आले ते मी केले. नवोदित आणि मान्यवर कवींच्या कविता, गाणी संगीतबद्ध केली. या प्रवासात अनेक ओळखी झाल्या, दिग्गज मान्यवरांचा सहवास लाभला. माणसांचे प्रेम आणि स्नेह मिळाला. आयुष्याच्या या टप्प्यावर मी समाधानी आणि कृतार्थ आहे, अशी भावना व्यक्त करत ऋजू व निर्मळ मनाच्या या व्यक्तिमत्त्वाने गप्पांचा समारोप केला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasant ajgaonkar chat with shekhar joshi
First published on: 05-02-2017 at 02:21 IST