भारतात बॉलिवूड कलाकारांमध्ये एका व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. ही व्यक्ती बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका कनिका कपूर आहे. पण कनिकाने ही गोष्ट सर्वांपासून लपवली. तिने एका मोठ्या हॉटेलमध्ये आयोजीत केलेल्या पार्टीला देखील हजेरी लावली. आता पार्टीमध्ये कोण सहभागी झाले होते आणि त्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

काही दिवसांपूर्वी कनिका लंडनला गेली होती. तिकडून भारतात परतल्यावर तिने एका पार्टीमध्ये हजेरी लावली होती. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार या पार्टीमध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचा मुलगा दुष्यंत सिंह हे देखील उपस्थित होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दुष्यंत यांनी संसदेत हजेरी लावली. तेथे ते सुरेंद्र नगर निशिकांत आणि मनोज तिवारी यांच्यासोबत बसले होते.

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार ही पार्टी काँग्रेसचे जतिन प्रसाद यांचे सासरे आदेश सेठ यांनी ठेवली होती. या पार्टीला वसुंधरा राजे, दुष्यंत सिंह, उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रकाश सिंह, संजय मिश्रा आणि इतर दिग्गज उपस्थित होते. कनिकाला करोना झाल्यामुळे आता तेथे उपस्थित असणाऱ्या लोकांचा प्रशासन शोध घेत आहे.

शुक्रवारी कनिका लंडनहून भारतात आली. त्यानंतर तिला चार दिवस ताप आला. तिने करोना चाचणी करुन घेतली. ही चाचणी पॉझिटीव्ह आल्यामुळ लखनऊमध्ये तिला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. खुद्द कनिकाने सोशल मीडिया पोस्टद्वारे करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली. कनिकाने ‘बेबी डॉल’, ‘बीट पे बूटी’, ‘टुकुर टुकुर’ ही गाणी गायली आहेत. तसेच तिने काही रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणूनही काम केले आहे.