‘बिग बॉस मराठी’च्या घरात 75 व्या दिवसाकडे वाटचाल होताना स्पर्धकांमधील चुरस वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री वीणा जगताप व शिव ठाकरे यांची मैत्रीही रंगताना दिसत आहे. कारण वीणाने आता चक्क तिच्या पापण्यांवर शिवचं नाव कोरलं आहे.
‘बिग बॉस’च्या घरात उरलेल्या नऊ स्पर्धकांमध्ये सध्या चढाओढ सुरु आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये वीणाने तिच्या पापण्यांवर शिवचं नाव लिहिल्याचं पाहायला मिळत आहे. वीणाने आयब्रो पेन्सिलच्या मदतीने शिवचं नाव लिहिलं असून त्याच्या नावाच्या बाजूला हार्ट काढल्याचंही दिसत आहे. आता वीणाने हे कशासाठी केलं हे मात्र आगामी एपिसोड्समध्येच पाहायला मिळेल.
मंगळवारी पार पडलेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये नेहाने घराचा कॅप्टन होण्याचा मान पटकावला. तर हीनाने केलेल्या चुकीची खूप मोठी किंमत तिला मोजावी लागली. घराबाहेर पडल्यानंतर महेश मांजरेकर यांनी रुपालीला एका सदस्याला सेफ करण्याची संधी दिली होती. त्यानुसार हातावर ‘रुपाली’च्या नावाचा टॅटू काढणाऱ्या हीनाला तिने सेफ केलं होतं. मात्र तुला इम्युनिटीचं महत्त्व नसल्याचं सांगत बिग बॉसने तिची इम्युनिटी काढून घेतली. त्यामुळे आता हीनासुद्धा नॉमिनेट होऊ शकते.