ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन झाले आहे. त्या ६० वर्षांच्या होत्या. पंढरपूर ते कुर्डूवाडी रस्त्यावर रोपळे गावानजीक उजनी कालव्याच्या अरुंद पुलावरून त्यांची फॉर्च्युनर गाडी ५० फूट खोल कालव्यात कोसळली. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात इतर तीन जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मोडलिंबकडून पंढरपूरकडे येत असताना काल (२७ नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. पंढरपूर ते कुर्डूवाडी रस्त्यावर रोपळे गावानजीक उजनी कालव्याच्या अरुंद पुलावरून जात असलेल्या फॉर्च्युनर गाडीचे नियंत्रण सुटले. त्यानंतर ती गाडी थेट ५० फूट खोल कालव्यात जाऊन कोसळली. या अपघातात मोडनिंबमधील ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांची कन्या, नात आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत.
आणखी वाचा : ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम कल्याणी कुरळेला ट्रॅक्टरची धडक, अभिनेत्रीचा जागीच मृत्यू

या अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मदतकार्याला सुरुवात केली. मात्र गाडी ज्या कालव्यात कोसळली होती, त्या कालव्यात उतरायला जागा नसल्यानं बचाव कार्य करण्यात अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे स्थानिकांनी दोराच्या सहाय्यानं जखमींना बाहेर काढून, तात्काळ रुग्णवाहिका बोलवून उपचारासाठी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं.

आणखी वाचा : नवं हॉटेल, आठवड्यापूर्वी वाढदिवस अन् ट्रॅक्टरची धडक; ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्रीला आधीच लागली होती मृत्यूची चाहूल? व्हिडीओ चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या अपघातात मीना देशमुख यांचा जागीच मृत्यू झाल्याचं समोर आलं. रात्रीच्या वेळी या रस्त्यावरील अरुंद पुलावरून गाडी जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यानं ही गाडी या खोल कालव्यात पडल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. अरुंद पुलामुळे या परिसरात अनेकदा अपघात झाला आहे. त्यात अनेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार आणखी किती बळींची वाट पाहणार आहेत असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित होत आहे.