माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळावर आधारित ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ चित्रपटाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. नऊ सेकंदांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कदाचित तुम्हाला व्हिडीओतील व्यक्ती माजी पंतप्रधान मनमोहन सिंग असल्याचं वाटेल. पण थांबा, कारण हे दुसरं तिसरं कोणी नसून चित्रपटात मनमोहन सिंग यांची भूमिका साकारणारे अभिनेता अनुपम खेर आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनुपम खेर यांची भूमिकेचा अत्यंत बारीक अभ्यास केला असून भूमिकेला योग्य न्याय दिला असल्याचं दिसतंय. त्याचं चालणं हुबेहूब मनमोहन सिंग यांच्यासारखं आहे. भारतीय राजकारणातील एका महत्त्वाच्या पर्वावर भाष्य करणाऱ्या ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणास लंडनमध्ये सुरुवात झाली आहे. एएनआयने हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही काळासाठी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार असणाऱ्या संजय बारू लिखित ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर- मेकिंग अँड अमेकिंग ऑफ मनमोहन सिंग’ या पुस्तकावर या बहुचर्चित चित्रपटाचं कथानक आधारित असणार आहे. या पुस्तकातून मनमोहन सिंह यांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे चित्रपटाचं कथानक आणि त्यातील पात्र पाहता हा चित्रपट खऱ्या अर्थाने मल्टीस्टारर असेल असं म्हणायला हरकत नाही. अनुपम खेर यांच्या व्यतिरिक्त अभिनेता अक्षय खन्ना, अभिनेत्री आहाना कुमरासुद्धा या चित्रपटातून झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अतिशय महत्त्वाच्या आणि गंभीर कथानक असणाऱ्या या चित्रपटाविषयी खेर यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली. ‘मनमोहन सिंह यांची भूमिका साकारणं माझ्यासाठी एक प्रकारचं आव्हानच आहे. ते अशा काळात भारतीय राजकारणात सक्रिय होते, ज्यावेळी माध्यमांची सक्रियता प्रचंड वाढली होती. त्यांच्या व्यक्तीमत्वाविषयी अनेकांना, संपूर्ण जगाला बऱ्याच गोष्टी माहित होत्या. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून मी त्यांच्या व्यक्तिरेखेविषयी बराच अभ्यास केला. आता त्याचा फायदा मी चित्रपटासाठी करुन घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेन’, असं ते म्हणाले. २१ डिसेंबरला हा चित्रपट प्रसिद्ध होणार आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of anupam kher walking in manmohan singh style
First published on: 12-04-2018 at 05:20 IST