Video: ‘त्या’ व्यक्तीची भेट घेण्यासाठी रोहित शेट्टी थेट उल्हासनगरमध्ये; एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी

रोहित शेट्टीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केल्याचं चित्र यावेळी पहायला मिळालं, हा व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय.

rohit shetty pays surprise visit to youtuber ashish chanchlani in ulhasnagar
या व्हिडीओला १३ लाखांहून अधिक लाईक मिळालेत

सध्या मनोरंजन सृष्टीमध्ये चर्चा आहे ती दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाची. दिवाळीच्या मुहूर्तावर रोहित शेट्टीचा हा बहुप्रतिक्षित मल्टीस्टारर चित्रपट प्रदर्शित झाला. जवळजवळ दोन वर्षानंतर एखाद्या चित्रपटाने तिकीट बारीवर दमदार कामगिरी केल्याचं चित्र या चित्रपटाच्या निमित्ताने पहायला मिळालं. एकीकडे देशभरामध्ये या चित्रपटाची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे या चित्रपटाचा दिग्दर्शक मात्र एका खास कारणासाठी थेट आपल्या गाडीने मुंबईहून उल्हासनगरच्या गल्लीबोळांमधून प्रवास करत एका खास व्यक्तीला भेटण्यासाठी आल्याचं पहायला मिळालं. रोहितच्या या कृतीने अनेकांची मनं जिंकली आहेत. सध्या या भेटीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

झालं असं की युट्यूबच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेला युट्यूबर आशिष चंचलानी हा राहतो उल्हासनगरमध्ये. आशिष हा रोहितचा चांगला मित्र आहे. काही दिवसांपूर्वीच एका ठिकाणी रोहित शेट्टीने आशिष चंचलानीला मी तुला भेटण्यासाठी नक्की एकदा उल्हासनगरमध्ये येईल, असा शब्द दिला होता. आपल्या मित्राला दिलेलं हे वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी थेट आशिषच्या घरी पोहचला आणि ते ही उल्हासनगरमध्ये. रोहितच्या त्याच्या लॅण्ड रोव्हर गाडीमधून रोहितच्या घरी पोहचला. रोहितच्या गाडीच्या पुढे आणि मागे पोलिसांच्या गाड्यांचा ताफा होता. चिंचोळ्या गल्ल्यांमधून रोहितची गाडी थेट आशिष राहतो त्या इमारतीच्या गेटमधून आत शिरली तेव्हा रोहितला पाहण्यासाठी इमारतींच्या बाल्कन्यांमध्ये स्थानिकांनी मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळालं.

आशिषने एक भावनिक पोस्ट लिहित हा व्हिडीओ शेअर केलाय. “एका खोलीमध्ये बसून व्हिडीओ बनवण्यापासून ते थेट रोहित शेट्टीला उल्हासनगरमध्ये आणण्यापर्यंत… आयुष्य हे अनेक चमत्कारांनी भरलेलं असतं. आज माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी फारच भावनिक दिवस होता. काय छान दिवस होता. दिलेला शब्द पाळल्याबद्दल धन्यवाद रोहित शेट्टी. तू जगातील कोणत्याही ठिकाणाला भेट देऊ शकतोस पण तू माझ्या घरी भेट देण्याचा निर्णय घेतला. तू लोकांची आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या नात्याची काळजी करतो. त्यामुळेच अनेकजण तुझ्यावर प्रेम करतात आणि तुला सन्मान देतात,” असं आशिषने म्हटलं आहे.

आशिषने पोस्ट केलेल्या या व्हिडीओला १३ लाखांहून अधिक लाईक्स आहेत तर त्यावर तीन हजारांहून अधिक जणांनी कमेंट्स केल्या आहेत. आशिषची भेट घेतल्यानंतर रोहित येथील सेंट्रल पोलीस ठाण्यामध्ये गेला. यावेळी पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी गुलाबाचे फुल देऊन सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने रोहितचं स्वागत केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Video rohit shetty pays surprise visit to youtuber ashish chanchlani in ulhasnagar scsg

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या