त्याकाळी- म्हणजे सत्तरच्या दशकात विजय तेंडुलकरांचं ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक बरंच गाजलं होतं, वादग्रस्त ठरलं होतं. रवींद्र नाट्य मंदिरमधील त्याचा प्रयोग उधळून लावण्याचा प्रयत्न झाला होता. आज त्याच रवींद्र नाट्य मंदिरमध्ये पुनश्च ‘सखाराम’चा प्रयोग लागला होता आणि तो ओव्हरपॅक्ड होता. त्याला कडवा विरोध करणारे संस्कृतीरक्षक काळाच्या पटावरून अस्तंगत झाले होते, त्यावेळची कथित नैतिकतावादी, बाळबोध पिढीही संपुष्टात आली होती आणि त्याकाळचा ‘सखाराम’चा सूचक प्रयोग आज उघडावाघडा, बोल्डरीत्या सादर होत होता. एकुणात काय, ‘कालाय तस्मै नमः’!
माणसाच्या मनातील वृत्ती-प्रवृत्ती, इच्छा, वासना, विकार, नैतिकता-अनैतिकता, स्त्री-पुरुष संबंध, त्यातील राजकारण, पुरुषी मानसिकता यांचा सखोल वेध विजय तेंडुलकर यांनी त्याकाळी ‘सखाराम’मधून घेतला होता. पण त्यावेळचा सोवळा, ढोंगी समाज ते कबूल करायला राजी नव्हता. त्यातूनच हा विरोध झाला होता.
आजही हे वास्तव फारसं बदललंय अशातला भाग नाही. म्हणजे जे पूर्वी गुपचूप, चार भिंतींच्या आत चालायचं ते आज आधुुनिकतेच्या नावाखाली उघड उघड होऊ लागलं असलं तरी आजचं राजकीय, सामाजिक वास्तव मात्र मध्ययुगीन काळाकडे मार्गक्रमणा करीत आहे. त्यामुळे आजही ‘सखाराम’ला विरोध होणारच नाही असं नाही. कारण आजही आपल्या ‘कथनी आणि करणी’मधला फरक तोच आहे. उलट, तो आज अधिकच तीव्र झाला आहे. याला कारण आहे आजचं संकुचित, ढोंगी, प्रतिगामी राजकीय वास्तव! आणि वरकरणी आधुनिक झाल्यासारखी दाखविणारी, पण वरवर खरवडली तर तीच ती जुनी, मध्ययुगीन, काळाच्या पल्याडची सामाजिक मानसिकता आजदेखील कायम असलेली पाहायला मिळते. किंवा तसं जर काही नसेल तर मग आजचा समाज पुराणमतवादी राजकीय वास्तवतेला तरी नक्कीच घाबरत असावा.
‘सखाराम बाइंडर’ ज्या काळात आलं तेव्हा त्याच्या बाजूने उभे राहणारेही अनेक लोक होते. ते प्रतिगामी विचारांच्या झुंडशाहीला कडाडून विरोध करीत होते. अर्थात आज हे दृश्य दिसेल की नाही हे सांगता येत नाही. त्याची कारणं अनेक आहेत. तर ते असो.
‘सखाराम’चं संक्षिप्त कथानक असं : सखाराम हा भणंग, भंगड गृहस्थ. रीतसर लग्न न करता परित्यक्ता, विधवा स्त्रियांना हेरून त्यांना आश्रय देण्याच्या मिषाने आपल्या घरी आणणारा आणि स्त्रीकडून पुरुषाला असलेल्या आपल्या अपेक्षा आणि गरजा (ज्या लग्नाच्या बायका सर्वस्वानं पुरवतात.) भागवणारा. त्या बदल्यात त्या स्त्रीला अन्न, वस्त्र, छत पुरवणारा. मात्र दोघांपैकी एकाला या संबंधांत कंटाळा आला की त्या स्त्रीनं बाहेरचा रस्ता धरायचा, ही त्याची पूर्वअट. अशी त्याची सहा प्रकरणं आजवर झालेली.
लक्ष्मी ही सातवी. तिला तिच्या नवऱ्यानं छळून, मार मार मारून घराबाहेर काढलेलं. सखाराम तिला आश्रय देतो. पण तिचं देव देव करणं, सोवळंओवळं, रूढी-परंपरावादी विचार वगैरे त्याच्याच्यानं निभत नाहीत. इकडे सखारामची शारीरिक भूक आणि घरातलं काम याने लक्ष्मीचा पिट्ट्या पडतो. त्यामुळे तीही हळूहळू कावते… चिडचीड करू लागते. सखारामलाही एव्हाना तिचा कंटाळा आलेला असतोच. शेवटी सखाराम तिला बाहेरचा रस्ता दाखवतो.
तिच्यानंतर येते ती चंपा. तिचा पावणेआठ नवरा तिचा भयंकर छळ करीत असतो. असह्य झालं तेव्हा ती घरदार सोडते. सखाराम तिला गाठतो. ती एकदम फटाकडी, रोखठोक आणि बोलभांड असते. दारू प्यायल्याबिगर ती सखारामला आपल्याला हातही लावू देत नाही. तिची जवानी आणि आक्रमक रूपाचा सखाराम दीवाना होतो. पण सखारामच्या घरचं आणि दारचं करण्यात आणि वर सखारामची भयंकर वासना भागविण्यात तिचा पार दम निघतो. तीही कावते.
अशात एके दिवशी पुतण्याने घराबाहेर काढलेली लक्ष्मी सखारामच्या दारी परत येते. सखारामचा तिला घरात घ्यायला कडवा विरोधच असतो. परंतु लक्ष्मीची हतबलता पाहून आणि ती या घरात आली, निमुटपणे राहिली तर आपल्यावरचा ‘कामा’चा भारही थोडासा हलका होईल असा विचार करून चंपाच तिला घरात आश्रय देते. अर्थात पुढे काय होतं हे नाटकात पाहणंच योग्य.
तेंडुलकरांनी एका जगावेगळ्या स्त्री-पुरुष नातेसंबंधांचं हे तिरपागडं, व्यामिश्र, गुंतागुंतीचं रूप या नाटकात चित्रित केलेलं आहे. त्याचबरोबर त्या अनुषंगानं धर्म, जगण्याचे संकेत, त्याला आव्हान देणाऱ्यांची होणारी वाताहत वगैरे मुद्देही त्यांनी नाटकात मांडले आहेत. माणसाच्या मनातील खोल डोहात उतरून तेंडुलकरांनी मांडलेलं हे भीषण वास्तव आजही अंगावर येतं.
दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव यांनी हा प्रयोग बसवला आहे. त्यांनी तेंडुलकरांना अपेक्षित असलेलं वासनेचं भयंकर रूप उघडपणे प्रयोगात मांडलं आहे. त्या अर्थाने आजवरच्या ‘सखाराम’च्या प्रयोगांत हा प्रयोग त्यातल्या आशयाच्या अधिक जवळ जाणारा आहे. दिग्दर्शकाने सूचकतेचं सोवळं इथं पार झुगारून दिलं आहे. त्यामुळे हा प्रयोग जास्तीच अंगावर येतो. या प्रयोगात सगळी पात्रं आपापल्या भूमिकेशी प्रामाणिक असलेली जाणवतात. सखाराम वासनांध, पण आपली अशी एक नैतिकता पाळणारा आहे. तो दारूबाज, गांजेकस, उठसूठ शिव्या तोंडी असणारा, ठेवलेल्या स्त्रीला प्रसंगी मारझोड करणारा असा कसाही असला तरी त्याचं म्हणून जगण्याचं एक तत्त्वज्ञान आहे.
लक्ष्मी वरकरणी साधीभोळी, पापभिरू वगैरे वाटत असली तरी प्रसंगी ती क्रूर, व्यवहारीही होऊ शकते. चंपा स्पष्टवक्ती, तोंडाळ, आक्रमक तशीच मनानं काहीशी सरळमार्गी आहे. चंपाचा नवरा भ्रष्ट, पार वाया गेलेला, दारूडा आणि बायकोचा वेडा आहे. तर दाऊद हा सखारामचा जिगरी दोस्त, त्याच्या पाप-पुण्यात सक्रीय सहभागी असणारा. ही सगळी पात्रं दिग्दर्शकानं यथार्थपणे सादरीत केली आहेत. त्यांचे व्यवहार, वागणं-बोलणं, आचार यांतून त्यांची व्यक्तिमत्त्वं आकारास येतात. त्यांच्यातले परस्परसंबंध आणि त्यांचं अंतर्गत मानसिक राजकारणही त्यातून उलगडत जातं. त्यामुळे प्रयोग अधिकच अंगावर येतो.
नेेपथ्यकार सुमित पाटील यांनी सखारामचं घर तपशिलांनिशी उभं केलं आहे. त्यातून वेगवेगळ्या प्रसंगांना आवश्यक तो अवकाश उपलब्ध झाला आहे. श्याम चव्हाण यांनी प्रकाशयोजनेतून दिवसाचे निरनिराळे प्रहर अधोरेखित केले आहेत. आशुतोष वाघमारे यांनी संगीतयोजनेतून नाटकातल्या घटना- प्रसंगांची तीव्रता कमी-अधिक ठळक केली आहे. शरद सावंत यांची रंगभूषा आणि तृप्ती झुंजारराव यांची वेशभूषा पात्रांना त्यांची व्यक्तिमत्त्वं बहाल करतात.
सयाजी शिंदे यांनी सखारामचं भणंग, गावावरून ओवाळून टाकलेला वासनांध सांड हे रूप वास्तवदर्शीत्वानं साकारलं आहे. माणूस म्हणून सखारामच्या वेगवेगळ्या भावावस्था त्यांनी उत्तमरीत्या वठवल्या आहेत. उत्तरार्धात चंपाचा जीव घेतल्यावर सखारामचं हतबुद्ध होणंही त्याच तीव्रतेनं येतं. सखारामचा समाजाची कसलीही भीडमुर्वत न ठेवणारा, आक्रमक ते हवालदिल हा प्रवास सयाजी शिंदे यांनी उत्कटपणे दाखवला आहे.
नेहा जोशी यांनी वरपांंगी साधीभोळी, देव देव करणारी, त्यायोगे सखारामला सुधरू पाहणारी आणि नंतर चंपाच्या घरातल्या स्थानाला आपल्या स्वार्थापायी उखडू पाहणारी पाताळयंत्री लक्ष्मी तिच्या बदलत्या मानसिकतेसह छान आकारली आहे. अनुष्का विश्वास यांची चंपा बिनधास्त, फटाकडी, तोंडाळ, सखारामच्या वासनांधतेला आव्हान देणारी आणि त्याला त्यात पराभूत करणारी, पण मनानं सरळमार्गी अशी आहे. तिचा भूतकाळ तिला अशी घडवतो. पावणेेआठ असलेल्या नवऱ्याबद्दलची कमालीची चीड आणि त्या संतापातून तिनं त्याला हडतूड करणं हेही ओघानं आलंच.
सखारामच्या बरोबरीनेच चंपाचं सेक्समधील आक्रमक रूप ठाशीवपणे नाटकात येतं. सखारामचा यारदोस्त दाऊदच्या भूमिकेत चरण जाधव फिट्ट बसले आहेत. सखारामच्या पाप-पुण्यात त्याची साथसोबत महत्त्वाची. अभिजीत झुंजारराव यांनी चंपाचा एकेकाळी मुजोरी करणारा, पण आता परिस्थितीनं गलितगात्र झालेला, लाळघोट्या, परिस्थितीशरण नवरा यथातथ्य साकारलाय. एकुणात, हा आजचा ‘सखाराम’ आहे.
