ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे पुन्हा एकदा छोटय़ा पडद्यावर त्यांच्या चाहत्यांना भेटणार आहेत. निमित्त आहे कलर्स मराठी वाहिनीवर येत्या ५ जूनपासून सुरू होणाऱ्या ‘बालपण दे गा देवा’ या मालिकेचे. सोमवार ते शनिवार या दिवशी रात्री नऊ वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे.
‘निरागसतेच्या गावी श्रद्धेचा खेळ नवा’ या कथासूत्रावर आधारित मालिकेत आजोबा आणि नात यांचे भावनिक नाते उलगडले जाणार आहेच; पण त्याचबरोबर त्यांच्या नात्यापलीकडे समाजात घडणारे व चर्चित विषय एका वेगळ्या प्रकारे प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘सेवन्थ सेन्स मीडिया’निर्मित आणि गणेश पंडित लिखित या मालिकेत विक्रम गोखले हे आजोबांच्या तर मैथिली पटवर्धन ही बाल कलाकार त्यांच्या नातीच्या भूमिकेत आहे. श्रद्धा जर डोळस असेल तर ती माणसाच्या जगण्याला आधार देते. माणूस श्रद्धेच्या बळावर अनेक अडचणींवर मात करू शकतो. पण श्रद्धेचा वापर करून अंधश्रद्धा बळकट केली गेली आणि एखाद्या व्यक्तीचे माणूसपण नाकारून तिला देवाच्या प्रतिमेत कैद केले तर? याचे चित्रण यात पाहायला मिळणार आहे.