दिग्दर्शक विशाल भारद्वाज ‘रंगून’ नंतर अत्यंत बोल्ड विषयावर चित्रपट बनवत आहे. या चित्रपटात शाहिद कपूर मुख्य भूमिका साकारणार असून अभिनेत्रीसाठी नव्या चेह-याचा शोध चालू आहे. यासाठी पडद्यावर बोल्ड आणि इंटिमेट सीन देऊ शकणा-या नव्या चेह-याचा शोध घेण्यात येतोय. मुलीचे वय १८ ते २८ वर्ष असणे गरजेचे आहे. अशाच प्रकारचे मॅसेजेस पाठवून रुपेरी पडद्यावर झळकण्याची इच्छा असलेल्या मुलींना फसवण्यात येत आहे. याविषयीची माहिती मिळताच दिग्दर्शक विशाल भारद्वाज याने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल भारद्वाज याला आपल्या सहका-याकडून बुधवारी याविषयीची माहिती मिळाली. त्याच्या नावावर आगामी चित्रपटासाठी मुलींकडून फोटो मागविले जात होते. मन कपूर नावाच्या एका व्यक्तिने त्यासाठी स्वतःचा व्हॉट्स अॅप नंबरही दिला होता. यावरच मुलींना फोटो पाठविण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर चित्रपटाविषयीची माहिती मिळताच अभिनेत्री बनू इच्छित असलेल्या १६ वर्षांच्या एका मुलीच्या आईने सदर मोबाईल नंबरवर फोन केला. तेव्हा त्यांना अभिनेत्रीला ऑडिशन दरम्यान काही किसिंग आणि इंटीमेट सीन करावे लागतील असे सांगण्यात आले. हे ऐकताच त्या दचकल्या आणि त्यांनी यातून बाहेर पडण्यासाठी शाहिदच्या तुलनेत आपली मुलगी फारच लहान असल्याचे सांगितले. त्यावर चित्रपटाचा विषय असाच बोल्ड असून यात अभिनेत्रीला शाहिदसोबत बोल्ड सीन द्यावे लागतील असे समोरच्या व्यक्तिने फोनवरून सांगितले.
या घटनेनंतर सदर महिलेने याबाबतची अधिकाधिक माहिती जाणून घेण्यासाठी ओळखीच्या काही व्यक्तिंकडे विचारपूस केली. त्यावर विशाल भारद्वाज असा कोणताच चित्रपट बनवत नसल्याचे सत्य समोर आले. दरम्यान, विशालने अंबोली पोलीस चौकीत तक्रार दाखल केली आहे. या सर्व प्रकाराने विशाल भारद्वाजला धक्काच बसला. आता झालेल्या या घटनेबाबत आपल्याला कळलं. पण या जाळ्यात अडकलेल्या अशा आणखी कितीतरी मुली असतील, असे विशाल म्हणाला. तसेच, विशालने त्या मुलीस पोलिसांकडे येऊन तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे. जेणेकरून आरोपीला लवकरात लवकर अटक होऊ शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishal bhardwaj filed fir for using his and shahid kapoors name for casting couch
First published on: 30-09-2016 at 14:21 IST