कॅनेडियन पॉर्न स्टार सनी लिऑनने भारतात पाऊल ठेवल्यापासून आपली ‘पॉर्न स्टार’ ही ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या दोन वर्षांत हिंदी चित्रपटातून आयटम सॉंग करत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सनीने आत्तापर्यंत तीन चित्रपटांमध्ये नायिका म्हणून काम केले असून तिचा चौथा चित्रपट पोस्ट प्रॉडक्शनमध्ये आहे. अल्पावधीत बॉलिवूडमध्ये आपला जम बसवणारी सनी अजूनही चित्रपटातील आपल्या भूमिकांविषयी फारशी समाधानी नाही. ‘एमटीव्ही स्प्लिट्व्हिला’च्या निमित्ताने छोटय़ा पडद्यावर पदार्पण करण्यास उत्सूक असणाऱ्या सनीने आपल्याला यशराज बॅनरची नायिका व्हायचे आहे, अशी महत्वाकांक्षा बोलून दाखवली.
   ‘रागिणी एमएमएस २’च्या भरघोस यशानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेली सनी लिऑन छोटय़ा पडद्यावर एम टीव्हीच्या ‘स्प्लिटव्हिला’ च्या सातव्या पर्वाचे सूत्रसंचलन करताना दिसणार आहे. त्यानिमित्ताने बोलताना एकंदरीतच ‘रागिणी एमएमएस २’ ला मिळालेल्या यशातून ती बाहेर पडलेली नसल्याचे कबूल करते. या चित्रपटाला मिळालेला चाहत्यांचा प्रतिसाद हा थक्क करणारा आहे, असे ती म्हणते. मात्र, त्याचवेळी लोकांच्या मनात असलेली तिची प्रतिमा अजून पूर्णपणे बदललेली नाही हेही ती कबूल करते. अजूनही मला ‘सेक्स’ अपील असणाऱ्या भूमिकाच मिळत आहेत. माझ्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलायला वेळ लागेल पण, कुठेतरी त्याची सुरूवात झाली आहे, असे तिने यावेळी बोलताना सांगितले. आत्तापर्यंत सनीने केलेल्या तिन्ही चित्रपटात मग तो ‘जिस्म’ असेल, ‘जॅकपॉट’ असेल किंवा एकता कपूरचा ‘रागिणी एमएमएस २’ असेल, तिने मुख्य नायिकाच साकारली आहे. मात्र, या भूमिकांवर समाधान न मानता मला यशराजच्या चित्रपटातील पारंपरिक नायिकेच्या भूमिकाही करायच्या आहेत, असे सनीने सांगितले. अर्थात, यशराजपर्यंत पोहोचण्याचा मार्ग खडतर आणि कष्टप्रद आहे याची जाणीवही तिला आहे. येत्या वर्षभरात तिने साकारलेली भारतीय नारी पडद्यावर पहायला मिळेल, असे आश्वासनही तिने दिले आहे.  ‘रागिणी एमएमएस २’ चित्रपटाच्या प्रसिद्धीनिमित्ताने एमटीव्हीच्या संपर्कात आलेल्या सनीला या शोबद्दल विचारणा झाली. काहीतरी नवीन करायला मिळेल या  उद्देशाने आपण या शोमध्ये सूत्रसंचालक म्हणून काम करण्यास होकार दिल्याचे सनीने सांगितले. ‘स्प्लिट्व्हिला’ हा अर्थातच रिअ‍ॅलिटी शोचा प्रकार आहे. त्यापलीकडे जाऊन टीव्हीवर दैनंदिन मालिका करणार का?, असे विचारल्यावर दैनंदिन मालिका करायला नक्की आवडेल, असे सनीने सांगितले. माझ्या व्यक्तिमत्वाला साजेल अशी भूमिका दैनंदिन मालिकेतून साकारायला मिळणार असेल तर ते करायला मला आवडेल, असे तिने यावेळी बोलताना सांगितले.  ‘स्प्लिटव्हिला’च्या चित्रितरणानिमित्त काही काळ राजस्थानमध्ये वास्तव्य करण्याची संधी मिळालेली सनी सध्या राजस्थानच्या प्रेमात असल्याचे सांगते. तिथल्या हवेल्यांमध्ये राहिल्यानंचर आपण तिथली राणीच असल्याचा भास होतो, असे ती म्हणते. राजस्थान खूप सुंदर आहे. चित्रिकरणाच्यादरम्यान राजवाडय़ात वास्तव्याला असताना एखाद्या राणीप्रमाणेच आपण वावरत होतो. त्याच थाटात तिथल्या राजस्थानी पदार्थाचा आस्वाद घेत होतो. एकंदरीतच हा राजेशाही अनुभव होता, असे तिने सांगितले.
एरव्ही तिला लागलेले ‘सेक्सी’ लेबल सोडले तर वास्तवात आपण तेवढे रोमँटिक नाही, असा धक्काही तिने या मुलाखतीत दिला. एक पत्नी म्हणून मी खूप भाग्यशाली आहे कारण माझे पती माझी प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट जपतात. त्याउलट, त्यांच्यासाठी काही करायचे असेल तर माझा गोंधळ उडतो. अशावेळी, कधीतरी आईने सांगितलेला ‘पुरूषांच्य़ा ह्रदयापर्यंत पोहोचण्याचा रस्ता पोटातून जातो’ हा कानमंत्र लक्षात ठेवून त्याच्यासाठी फर्मास जेवण बनवते, असे सनीने सांगितल्यावर या ‘बेबीडॉल’चे असेही रूप पहायला मिळाले.