बॉलिवूड मधली सर्वात व्यग्र अभिनेत्री कोण असा जर प्रश्न विचारला गेला तर त्यात प्रियांका चोप्राचे नाव अग्रस्थानी येईल यात काही शंका नाही. बॉलिवूड, हॉलिवूड सिनेमे, मालिका, प्रमोशन, स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आणि इतर कार्यक्रम यांमुळे तिला दिवसातले २४ तासही पुरत नसतील. पण तुम्हाला माहित आहे का की, जेव्हा तिने हॉलिवूडमध्ये काम शोधायला सुरुवात केली होती तेव्हा तिला एकाच गोष्टीची सर्वाधिक चिंता असायची ती म्हणजे त्या सिनेसृष्टीत ती तिचे नाव कमावू शकेल की नाही याचे.

३४ वर्षीय प्रियांकाला अमेरिकेतल्या ‘क्वांटिको’ या टीव्ही मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय स्थरावर प्रसिद्धी मिळाली. या टीव्ही मालिकेच्या प्रसिद्धी नंतर ती अनेक नावाजलेल्या टॉक शोमध्ये दिसू लागली होती, अनेक कार्यक्रमांच्या अनावरणावेळीही ती मुख्य अतिथी म्हणून गेली, आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यांच्या रेड कार्पेटवरही ती दिसली होती. तर व्हाइट हाऊसमध्ये माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्यासोबत मेजवानीलाही तिने उपस्थिती लावली होती.

‘क्वांटिको २’ मागोमागच प्रियांका ‘बेवॉच’ या हॉलिवूडपटातूनही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रियांकाच्या अभिनय क्षेत्रातील वाटचाल पाहता ती प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाली आहे असेच म्हणावे लागेल. सिनेमा आणि मालिकेच्या चित्रिकरणात व्यग्र असणाऱ्या प्रियांकाने काही दिवसांची सुट्टी घेत आता सध्या ती भारतात आली आहे. पण, मायदेशी परतूनही प्रियांकाला तिच्या कामातून काहीच उसंत मिळत नाहीये. दरम्यान, तिच्या या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत नुकतीच प्रियांकाने डिझायनर मनिष मल्होत्राने खास तिच्यासाठी आयोजित केलेल्या एका ‘डिनर पार्टी’ला हजेरी लावली होती.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दीपिकाच्या आगामी ‘xXx द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटाविषयीसुद्धा प्रियांकाने वक्तव्य केले. प्रियांका आणि दीपिका या एकमेकांच्या खूपच चांगल्या मैत्रिणी आहेत. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडची ‘मस्तानी’ आणि ‘देसी गर्ल’ यांच्यात वादाची ठिणगी उडाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण, प्रियांकाच्या बोलण्यावरुन तरी तसे काहीच जाणवले नाही. प्रियांकाने यावेळी दीपिकाची फारच प्रशंसा करत ‘मी तिच्या सिनेमाचा ट्रेलर पाहिला. दीपिकाला मी त्यासाठी मनापासून शुभेच्छा देते आणि तिला अपेक्षित यश मिळावे यासाठी शुभेच्छाही देते’, असे प्रियांका म्हणाली.