VIDEO: महिला सबलीकरणासाठी फरहान म्हणतोय ‘जागो..’

फरहान अख्तर आणि सिद्धार्थ महादेवन यांनी हे गाणे गायले आहे.

'रॉक ऑन २' मध्ये या बॅन्डचा नवा अंदाज पाहण्यासाठी सिनेरसिकांमध्ये उस्तुकतेचे वातावरण दिसत आहे.

‘रॉक ऑन २’ या चित्रपटाचे ‘जागो’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. तरुणाईच्या उत्साहपूर्ण गर्दीसमोर एका स्टेजवर उभे राहत आभिनेता फरहान अख्तर ‘जागो….’ हे गाणे गाताना दिसत आहे. या गाण्याच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठीचे मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहेत. सर्वच महिलांनी स्वत:ची बाजू मांडून त्याच्या हक्कांसाठी लढून ते हक्क मिळवावेत असा संदेश या गाण्यातून देण्यात आला आहे. शंकर-एहसान-लॉय या त्रिकुटाने हे गाणे संगीतबद्ध केले असून फरहान अख्तर आणि सिद्धार्थ महादेवन यांनी हे गाणे गायले आहे. जावेद अख्तर यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गाण्याचे चित्रपण अत्यंत प्रभावीपणे करण्यात आले आहे. फरहानने ठोकलेली ‘जागो….’ची आरोळी तरुणाईच्या प्लेलिस्टचा भाग नक्कीच होईल असेच दिसते आहे.

‘रॉक ऑन’ या चित्रपटाला, त्यातील गाण्यांना आणि त्यातील पात्रांना मिळालेली प्रसिद्धी पाहता ‘रॉक ऑन २’ मध्ये या बॅन्डचा नवा अंदाज पाहण्यासाठी सिनेरसिकांमध्ये उस्तुकतेचे वातावरण दिसत आहे. फरहान अख्तर, अर्जुन रामपाल यांसह ‘रॉक ऑन २’मध्ये श्रद्धा कपूर आणि शशांक अरोरा हे नवे चेहरेसुद्धा पाहायला मिळणार आहेत.

अभिनेत्री श्रद्धा कपूर या चित्रपटात आपल्या आयुष्याबद्दल संभ्रमात असणारे एक पात्र रंगवणार आहे. गाणं तिची आवड आहे पण गाणं गायचं की नाही याबाबद मात्र ती निर्णयावर पोहोचली नाही असं काहीसं या सिनेमाचं कथानक आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमध्ये फरहान अख्तर अतिशय आक्रमक दिसत असून अर्जुन रामपाल आणि श्रध्दा कपूर यांच्या चेहऱ्यावरील भाव उत्सुकता निर्माण करणारे आहेत. ‘रॉक ऑन’ सिनेमाचा हा पुढील भाग असला तरी पोस्टरवर तसं न लिहिता, हातांच्या दोन बोटांनी ‘रॉक ऑन’चा हा पुढील भाग आहे हे दर्शवण्याचा केलेला प्रयत्न नक्कीच वेगळा म्हणावा लागेल. या चित्रपटात फरहान आणि श्रद्धाने काही गाणीही गायली असल्याचं म्हटलं जात आहे. शुजात सौदागर यांच्या दिग्दर्शनात साकारलेला हा बहुचर्चित ‘रॉक ऑन २’ ११ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Watch new song jaago from rock on