नटसम्राट या चित्रपटाचा ट्रेलर नुकताचं प्रदर्शित करण्यात आला. “कुणी घर देता का घर”? अशी आर्त साद घालत रस्त्यावर हतबल होऊन हिंडणा-या, आपलं हरवलेलं वैभव शोधणा-या महान नटाची शोकांतिका मांडणारं नाटक म्हणजे ‘नटसम्राट’. विल्यम शेक्सपिअरच्या गाजलेल्या विविध शोकांतिकांवरून प्रेरित होऊन अशीच एक शोकांतिका मराठीत नाट्यरूपात लिहिली वि. वा. शिरवाडकर यांनी. सत्तरच्या दशकात हे नाटक रंगभूमीवर आलं आणि त्याने एक नवा इतिहास रचत अभिनयाचा एक मोठा मापदंड निर्माण केला. नटसम्राटमधील अप्पासाहेब बेलवलकर हे मुख्य पात्र रंगभूमीवर साकारलं होतं ख्यातनाम अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी. प्रत्येक मराठी रसिकाच्या मनावर या नाटकाचं गारूड आजही कायम आहे. हेच नाटक आता रूपेरी पडद्यावर भव्य रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे ‘नटसम्राट’ या चित्रपटाच्या माध्यमातून. मराठी रंगभूमी, चित्रपट आणि हिंदी चित्रपटातही वेगळा ठसा उमटविणारे अभिनेते नाना पाटेकर यात अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारत आहेत. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तर विश्वास जोशी, नाना पाटेकर आणि अनिरूद्ध देशपांडे यांनी निर्मिती केली आहे.
रंगभूमीवर ज्युलियस सिझर, ऑथेल्लो, सुधाकर, हॅम्लेट अशी एकाहून एक सरस पात्र ज्याने लीलया साकारली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली त्या नटसम्राट गणपतराव रामचंद्र बेलवलकर ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकरांची ही कथा. अभिनयाची कारकिर्द भरात असताना कायम प्रकाशझोतात राहणारा हा नट कालपरत्वे या प्रकाशझोतापासून दूर जातो आणि त्याच्या नशिबी येतात अंधाराच्या वाटा.. त्याच्यावर भरभरून प्रेम करणारा रसिक प्रेक्षकच नव्हे तर त्याची स्वतःची मुलेही त्याला स्वतःपासून दूर करतात. आपल्या लोकांशी आणि रंगभूमीशी नातं तुटलेला हा नटसम्राट आपल्या पत्नीसोबत या जगापासून दूर जात हलाखीचं जीवन जगतो त्याच्या याच शोकांतिकेची गाथा म्हणजे नटसम्राट हे नाटक. याच नाटकावर आधारित ‘नटसम्राट’ चित्रपटामधून ही शोकांतिका आता प्रेक्षकांच्या भेटीस येतेय अतिशय भव्य रूपात. प्रसिद्धीच्या झोतात असताना चेह-यावर येणारा तो रूबाब आणि ती रया गेल्यानंतर चेह-यावर आलेली विषण्णता, जवळच्या लोकांनी दूर लोटल्यानंतर आयुष्यात आलेली हतबलता या सर्व गोष्टी समर्थपणे दाखवणं हे मोठं आव्हानचं. डॉ. लागू यांनी साकारलेली ही भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे. हीच भूमिका आता चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे नाना पाटेकरांसारख्या तेवढ्याच ताकदीच्या अभिनेत्याच्या अभिनयातून. याशिवाय चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले हेही एका महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या निमित्ताने तब्बल ३५ वर्षांनी विक्रम गोखले आणि नाना पाटेकर हे दोन दिग्गज अभिनेते रुपेरी पडद्यावर एकत्र येत आहेत.  ‘नटसम्राट’ येत्या १ जानेवारीला नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch trailer of natsamrat movie
First published on: 04-12-2015 at 13:07 IST