‘वेट विकेट’… अर्थात ओली खेळपट्टी ही सहसा वापरली न जाणारी, कारण खेळायला कठीण वाटणारी खेळपट्टी असते. या खेळपट्टीवर खेळताना तोंडघशी पडण्याचा किंवा क्लीन बोल्ड होण्याची संभावना जास्त असते म्हणून कसलेले खेळाडू सुद्धा ओल्या खेळपट्टीवर खेळणे टाळतात. आयुष्यात सुद्धा असे जिव्हाळ्याचे परंतु सामान्य चर्चेत टाळले जाणारे अनेक विषय असतात. अश्या ओल्या विषयांच्या खेळपट्टीवर नर्म विनोदाचे चौकार, रोजच्या आयुष्यातील उदाहरणांच्या चोरट्या धावा, सूचक शब्दांनिशी, आढेवेढे न घेता बिनधास्त प्रसंग यांचे मनाला गुदगुल्या करणारे षटकार म्हणजे ‘वेट विकेट’. Adult Stand up Comedy Show…
ह्यातील एडल्ट भाग म्हणजे सदर कार्यक्रमात चर्चिले जाणारे, ज्या बद्दल रोजच्या जीवनात बोलणे टाळले जाते असे विषय. हे विषय कळायला, पटायला, त्यांच्याशी रिलेट व्हायला आणि त्यावरील चर्चा एन्जॉय करू शकायला जी प्रगल्भता लागते, ती सज्ञान लोकांकडे अधिक प्रमाणात असते म्हणून कार्यक्रम फक्त ‘प्रौढांसाठी’. बहुतेक वेळी एडल्ट संकल्पनेशी जोडली गेलेली अश्लीलता, शिवराळ भाषा, ग्राम्य विनोद, अश्या गोष्टी ह्या कार्यक्रमात कुठेच आढळत नाहीत. ‘वेट विकेट’ पाहताना एखाद्या कुटुंबातील सर्व सज्ञान सदस्य, काही तास एकत्र बसून, रोजच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या पण शक्यतो न चर्चिल्या जाणाऱ्या विषयांवर बिनधास्त केलेली खुसखुशीत टिपण्णी ऐकून खुश होतील.
सादरीकरण आणि भाषेच्या वापराचा पारंपारिक मार्ग सोडून वेगळ्या, प्रगल्भ, आधुनिक आणि मोकळ्या विचारसरणीच्या प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन ‘वेट विकेट’ देखील थोड्या आधुनिक, फ्रेश स्वरुपात सादर केली जाते. ‘वेट विकेट’ चा पहिला प्रयोग मंगळवार १७ मे ला बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात रात्रौ ८ वा. तर दुसरा प्रयोग बुधवार १८ मे ला दादरच्या शिवाजी मंदिरला रात्रौ ८ वा. रंगणार आहे.
थोडक्यात, बंद दरवाजाआड, खाजगीत, आवडीने कुजबुजले जाणाऱ्या विषयांवर, प्रेक्षकांना थोड्या गुदगुल्या करत, प्रसंगी चिमटे काढत रंगमंचावरून केलेली तुफान फटकेबाजी म्हणजेच… ‘वेट विकेट’…
संग्रहित लेख, दिनांक 7th May 2016 रोजी प्रकाशित
वेट विकेट.. अॅडल्ट स्टॅण्ड अप कॉमेडी शो
ज्या बद्दल रोजच्या जीवनात बोलणे टाळले जाते असे विषय.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 07-05-2016 at 16:26 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wet wicket adult stand up comedy show