अभिनेता शाहरुख खान २५ जानेवारीला ‘रईस’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने व्यग्र असणाऱ्या शाहरुख खानने नुकताच पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ‘रईस’ या चित्रपटाबद्दल आणि चित्रपटसृष्टीच्या आजवरच्या कारकीर्दीबद्दल शाहरुखने मनमोकळ्या गप्पा मारल्या. रईसच्या डोळ्यात सुरमा भरलेल्या निराळ्या लूकपासून ते अगदी या चित्रपटातील सर्वात आव्हानात्मक दृश्याच्या चित्रिकरणाचा किस्साही शाहरुखने या संवादादरम्यान उलगडला. त्यावेळी त्याला एका विचित्र प्रश्नाला सामोरं जावं लागलं.

तू रुपेरी पडद्यावर जेव्हा अभिनेत्रींसोबत रोमान्स करतोस ते पाहून तुझ्या मोठ्या मुलाला म्हणजेच आर्यनला काय वाटते? असा प्रश्न शाहरुखला विचारण्यात आला. त्यावर शाहरुख म्हणाला की, तो जेव्हा मुलींसोबत रोमान्स करत असतो तेव्हा मी काय प्रतिक्रिया देतो हे त्याला माहित नसते. त्याचप्रमाणे तोही मला अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना पाहून प्रतिक्रिया देतो. आर्यन आणि त्याच्या मित्रांचा आयुष्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. मी त्यांच्यासोबत फिरायला जाऊ शकतो इतका त्यांच्यासाठी मी कूल आहे. पण, माझ्या भूमिकांविषयी त्याला काय आवडते किंवा काय आवडत नाही  हे मी त्याला आजपर्यंत विचारलेले नाही. कारण, ऑनस्क्रिन याला महत्त्व नाही.

पुढे शाहरुख म्हणाला की, आर्यन सध्या चित्रपट बनविण्याचे प्रशिक्षण घेत आहे. यावेळी मी त्याला जाने भी दो यारों चित्रपट दाखविला. पण तो चित्रपट मला जितका मजेशीर वाटला तितका त्याला वाटला नाही. वेळेनुसार आता विनोद बदलत चालले आहेत आणि तरुणांचा दृष्टिकोनही बदलत चालल्याचे पाहून मला आनंद होतो. आता तो खासकरून लघुपट बनवतोय. त्यामुळे मी कोणताही भेदभाव न करता त्याचे एखादे काम नाही आवडले तर मी त्याला सांगतो. राहिला प्रश्न मी माझ्या कामासाठी मुलांच्या सूचना घेण्याचा  तर मी त्यांच्याकडून कोणत्याच सूचना घेत नाही. तसेच, ती माझी मुलं असल्यामुळे त्यांना माझ्या चित्रपटांचाही वापर करू देत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या २५ जानेवारीला रईस प्रदर्शित होत आहे.