बॉलिवूड अभिनेता आणि परोपकर्ता आमिर खानने ‘सत्यमेव जयते’ या त्याच्या शोच्या पहिल्या पर्वातून भारतातील स्त्री-भ्रूण हत्या, बाल लैंगिक अत्याचार, हुंडा संबंधीची प्रकरणे, खाप पंचायत आणि समाजातील अन्य संवेदनशील प्रश्नांना वाचा फोडली. या शोच्या माध्यमातून अशाप्रकारच्या अनेक संवेदनशील सामाजीक प्रश्नांवर योग्यप्रकारे प्रकाशझोत टाकण्यात आला. आता आमिर ‘सत्यमेव जयते’चे दुसरे पर्व घेऊन येत आहे. यावेळच्या पर्वात यापुर्वी कधीही न पाहिलेल्या भारताचे दर्शन होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘सत्यमेव जयते-२’चा पहिला भाग बिहारमधील डोंगरातून एकट्याने खोदकाम करून रस्ता निर्माण करणाऱ्या दशरथ मांझी या व्यक्तीला समर्पित करण्यात आला आहे.

दशरथचा मुलगा भगिरथ मांझी आणि सुन बसंती देवी दशरथनगरमध्ये अत्यंत दारिद्रयाचे जिणे जगत असून,  ‘सत्यमेव जयते’च्या माध्यमातून आमिर खान त्यांची सत्यकथा जगापुढे मांडेल अशी त्यांना आशा आहे. याचबरोबर ‘सत्यमेव जयते’च्या दुसऱ्या पर्वात समाजात वाढत चाललेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नाला सुध्दा हात घातला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘सत्यमेव जयते’च्या अधिकृत टि्वटर खात्यावरून प्रसिध्द करण्यात आलेल्या पोस्टमध्ये, ते आपल्या देशाचा कणा आहेत! भारतीय शेतकऱ्यांच्या कष्टांची आपण कदर करतो का? असा प्रश्न उपस्थित करत, किसान की उन्नत्ती देश की प्रगती, असा संदेश देखील प्रसिध्द करण्यात आला आहे. देशात वाढत चाललेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा निश्चितच काळजीचा विषय असून, याविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आमिर खान सज्ज झाल्याचे जाणवते.

पहिल्या पर्वात देशातील स्त्रियांच्या अनेक प्रश्नांना उपस्थित करण्यात आले होते, यावेळी देखील आमिर खान स्त्रियांच्या प्रश्नांना हात घालेल असे दिसते. यात तो प्रामुख्याने मुलींच्या शिक्षणाविषयी भाष्य करेल असे वाटते. स्त्रियांना शिकवा, देश निर्माण करा, असा संदेश शोच्या टि्वटर खात्यावर प्रसिध्द करण्यात आला आहे. यावेळी देशातील युवकांच्या प्रश्नांना देखील महत्व दिल्याचे दिसून येते.

‘सत्यमेव जयते-२’ शोच्या प्रोमोमध्ये देखील युवकांचे महत्व अधोरेखीत करण्यात आले आहे. युवकांबरोबर एकत्रितरीत्या आपण क्रांती घडवून आणू शकतो, असा संदेश शोच्या टि्वटर खात्यावर प्रसिध्द करण्यात आला आहे. ते देशाचे भवितव्य असून, त्यांच्या चांगल्या भविष्याच्या खात्रीसाठी तुमचे काय योगदान आहे? असा प्रश्नदेखील येथे उपस्थित करण्यात आला आहे. यावेळी आमिरकडे भाष्य करण्यासाठी बऱ्याच गोष्टी असल्याचे जाणवते. ‘सत्यमेव जयते’च्या दुसऱ्या पर्वाच्या पहिल्या भागाचे प्रक्षेपण २ मार्च रोजी होणार असून, सलग पाच रविवार या शोच्या प्रेत्येक भागाचे प्रक्षेपण करण्यात येईल.