बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग हा किती अतरंगी कलाकार आहे हे काही वेगळे सांगायला नको. मनमिळाऊ स्वभाव असलेल्या या रणवीरला कोणी काही आव्हान दिले आणि ते त्याने पूर्ण केले नाही असे होईल का? मग त्यासाठी त्याला काहीही करायला लागले तरी तो मागेपुढे पाहणार नाही. त्याचा असाच एक जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे.
जवळपास दोन वर्षांपूर्वी हृतिक आणि कतरिनाचा बँग बँग हा चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या प्रमोशनकरिता हृतिकने सर्व कलाकरांना बँग बँग चॅलेंज देण्याची संकल्पना सुरु केली होती. त्यात त्याने रणवीरलाही मुंबईतील कोणत्याही प्रसिद्ध रस्त्याच्या मधोमध उभं राहून नाचण्याचं आव्हान दिलं होतं. रणवीरनेही हे आव्हान तेव्हा त्याच्या अंदाजात पूर्ण केलं होत. या व्हिडिओत रणवीरने हृतिकच्या क्रिश चित्रपटातील पोशाख परिधान करून आणि मास्क लावून चक्क वांद्रे येथील लिंकिंग रोडच्या मधोमध उभं राहून डान्स केला होता. त्यावेळी रणवीरने मास्क घातल्याने लोकांना त्याला ओळखता आले नाही. मात्र, शेवटी त्याने मास्क काढले आणि काही क्षणासाठी सर्व लोकही स्तब्धचं झाली. काही वेळापूर्वी अगदी वेड्यासारखा नाच करणारा हा मनुष्य अभिनेता रणवीर सिंग आहे हे लोकांना कळताचं त्यांना धक्का बसला. मात्र, लोकांनी काहीही हालचाल करण्याच्या आतच रणवीरने आपले आव्हान पूर्ण करून तेथून पळ काढला. विशेष म्हणजे हे सर्व घडत असताना तेथे पोलिसही उपस्थित होते आणि त्यांनीही कुणीतरी वेडा रस्त्यात नाचत असल्याचे समजून त्याच्याकडे दुर्लक्ष केले. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल हे मात्र नक्की.