|| रवींद्र पाथरे

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अ. भा. मराठी साहित्य संमेलन नाशकात संपन्न होत आहे. करोनामुळे गेल्या वर्षी रद्द झालेले आणि नंतर साहित्य महामंडळातील उपद्व्यापी महानुभवांमुळे अकारण वादात अडकलेले हे साहित्य संमेलन आता नक्कीच होणार हे निश्चित झाले आहे. सर्वसंबंधित संमेलन यशस्वी करण्यासाठी कंबर कसून कामालाही लागलेले आहेत. या पार्श्वभूमीवर करोनाच्या साथीपायीच पुढे ढकलले गेलेले ‘शतकमहोत्सवी’ नाट्यसंमेलन आता कधी होणार, हा प्रश्न समस्त नाट्यरसिक आणि रंगकर्मींना पडला नसेल तरच नवल!

मोठ्या धूमधडाक्यात शतकी नाट्यसंमेलन साजरे करावयाचे अ. भा. मराठी नाट्य परिषदेने ठरविले होते. त्यादृष्टीने नियोजनही करण्यात आले होते. सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वी आधुनिक मराठी रंगभूमीचा पाया जिथे घातला गेला त्या सांगलीत मार्चमध्ये या शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनास प्रारंभ होऊन पुढील तीनेक महिन्यांत विविध ठिकाणी संमेलनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार होते. आणि जूनमध्ये मुंबईत या संमेलनाची भव्यदिव्य सांगता होणार होती. ज्या तंजावरमध्ये तीनेकशे वर्षांपूर्वी मराठी नाट्यपरंपरेची पताका मोठ्या निगुतीने जपली, संवर्धिली गेली होती, तिथेही ही संमेलनध्वजा फडकवण्याचा नाट्य परिषदेचा मानस होता. त्यादृष्टीने नियोजनही पक्के झाले होते. महाराष्ट्र सरकारने घसघशीत निधीही या शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाकरता मंजूर केला होता. या शतकी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल आणि उद्घाटक सई परांजपे यांची भाषणेही (बहुधा) लिहून तयार होती. अशी सगळी जय्यत तयारी झालेले हे नाट्यसंमेलन करोनाने पुरते झाकोळले आणि अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले गेले. ते अर्थातच स्वाभाविकही होते.

दरम्यान करोनाच्या दोन लाटांनी सगळे जग उलथेपालथे झाले. जगभरात प्रचंड जीवित-वित्तहानीबरोबरच सांस्कृतिक आणि कलाक्षेत्राचीही अपरिमित हानी झाली. मराठी नाट्यसृष्टीचे तर पार कंबरडेच मोडले. रंगकर्मींची वाताहत झाली. हातावर पोट असणाऱ्या रंगमंच कामगारांची तर दयनीयच अवस्था झाली. परंतु या भीषण संकटकाळात सर्वांनी एकजुटीने, सामंजस्याने मार्ग काढायला हवा, हे साधे तारतम्य राजकारणाने आणि स्वार्थबुद्धीने बरबटलेल्या काही मूठभर रंगकर्मींना राहिले नाही. अशा संकटकाळातही राजकारण, हेवेदावे, प्रसारमाध्यमांतील चिखलफेक, कोर्टकज्जे यांना ऊत आला. अ. भा. मराठी नाट्य परिषदेत उभी फूट पडली. अर्थात ती रंगभूमीच्या भल्यासाठी वगैरे बिलकूलच नव्हती. तर नाट्य परिषदेतील सत्ता आणि त्या अनुषंगाने मिळणारे लाभ यासाठी होती. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना पदच्युत करण्याचे राजकारण घडले. प्रकरण कोर्टात गेले. अजूनही या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही. परंतु त्यामुळे एक मात्र झालं. मध्यवर्ती नाट्य परिषद मृतप्राय झाली. यशवंत नाट्यसंकुल ठप्प झाले. करोनापश्चात आज नाट्यप्रयोगांना सरकारने परवानगी देऊनही यशवंत नाट्यसंकुल सुरूच होऊ शकणार नाहीए. कारण त्याला ‘ओसी’च मिळालेली नाही. इतकी वर्षे ते त्याविनाच सुरू होते. या सगळ्याला जबाबदार कोण? अर्थात त्याचे कर्तेकरवितेच!

सध्या नाट्य परिषद कुणाच्या ताब्यात आहे, हा प्रश्न समस्त रंगकर्मींना भेडसावतो आहे. दोन गट त्यावर दावा करताहेत. परंतु जोवर धर्मादाय आयुक्त या सुंदोपसुंदीवर निर्णय देत नाहीत तोवर हा तिढा सुटणार नाही. मधल्या काळात नाट्य परिषदेच्या नव्या विश्वस्तांची निवड झाली. या विश्वस्तांनी तरी हा तिढा सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता. परंतु तेही राजकारणात अडकले असल्याने सरळ मार्गाने तो सुटणं मुश्कीलच. याआधी नाट्यनिर्माता संघातदेखील उभी फूट पडलेली आहेच. आता नाट्य परिषदेचेही दोन तुकडे पडण्याची वेळ आली आहे. या सगळ्यात रंगभूमीच्या भल्याची मात्र कुणालाच काही पडलेली नाही. आधुनिक मराठी रंगभूमीच्या पावणेदोनशे वर्षांच्या वैभवशाली परंपरेचे आपण कितीही गोडवे गात असलो तरी तिला एक शापही आहे. नव्या नाटक कंपनीच्या मुहूर्ताचा नारळ फुटतो आणि मागोमाग ती कंपनीही फुटते, हा. तद्वत नाट्य परिषदेचेही होणार की काय अशी साधार भीती रंगभूमीच्या हितचिंतकांना सध्या वाटते आहे. नाट्य परिषदेत वर्षानुवर्षे काही धेंडं ही राजकारण करण्यासाठीच ठाण मांडून आहेत, हे इतक्या वर्षांचा परिषदेचा इतिहास जवळून पाहताना एक नाट्यरसिक म्हणून माझ्या अनुभवास आलेले आहे. रंगभूमीचं भलं, तिची प्रगती वगैरे गोष्टी या मंडळींच्या कधी मनातही येत नसाव्यात. अशा गणगांना नाट्य परिषदेचे सदस्य करून घेणाऱ्यांचंही हे पाप आहे. आणि नाट्य परिषदेची धुरा यापूर्वी ज्यांनी ज्यांनी वाहिली त्या बड्या नाववाल्या रंगकर्मींचं ते पाप आहे. आपली सत्ता टिकावी म्हणून कुणा सोम्यागोम्यांनाही नाट्य परिषदेचे सदस्य करून घेण्यात आले. त्यांच्या जोरावर नाट्य परिषदेचे अध्यक्षपद मिळवून ते मिरवण्यातच या रंगकर्मींनी धन्यता मानली. रंगभूमीचा, तिच्या प्रगतीचा विचार त्यात शून्य होता. ज्यांना रंगभूमीवर काहीएक करून दाखवायचं होतं अशी सरळमार्गी मंडळी त्यामुळे या घाणेरड्या राजकारणापासून आणि नाट्य परिषदेपासून नेहमी चार हात दूरच राहिली. आपले आपले काम करत राहिली. जे चुकूनमाकून नाट्य परिषदेत काहीएक भलं करायला गेले ते तोंडावर आपटले. दामू केंकरे, विजय तेंडुलकर, अरुण काकडे, मधुकर तोरडमल, सदाशिव अमरापूरकर प्रभृतींनी हा अव्यापारेषु व्यापार एकदा केला आणि तोंड पोळून घेतलं. आता नाट्य परिषदेत राजकारण एके राजकारणच चालतं.

या सगळ्या पार्श्वभूमीवर जिथे अ. भा. मराठी नाट्य परिषदच जागेवर नाही, तिथे शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनासाठी पुढाकार तरी कोण घेणार? आणि ते होणार तरी कसे? नाट्य परिषदेच्या विश्वस्तांनी स्वत: राजकारण बाजूला ठेवून नाट्य परिषदेतला हा तिढा सोडविण्यासाठी पुढाकार घेतला तरच यातून काहीतरी मार्ग निघू शकतो. पण…

हा ‘पण’च मोठे प्रश्नचिन्ह आहे.