नीलेश अडसूळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षी याच काळात रंगभूमीचा पडदा पडला, तो तब्बल नऊ महिन्यांनी उघडला. करोनाकाळात रंगभूमीची झालेली फरफट सगळ्यांनीच अनुभवली. अगदी उपासमारीपासून ते नैराश्यापर्यंत सगळे अनुभव घेऊन झाले होते. तो काळ परत कधीही येऊ नये, अशीच प्रार्थना प्रत्येक जण करत असला तरी सद्य:स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. कदाचित काही तरी खुणावणारी आहे. ज्या वेगाने करोनाबाधितांची रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे तो वेग आपल्याला पुन्हा टाळेबंदीपर्यंत नेऊ शकतो. अर्थात ते उद्या होईल वा होईलच असे नाही; परंतु वादळाची चाहूल ओळखून आपण आपली पूर्वतयारी केलेली कधीही बरी. कारण एकदा आपण त्या अनुभवातून गेल्याने आता त्यावर पर्याय शोधणे किंवा उपाय मिळवणे शक्य होऊ शकते. अर्थात ही बाब पोटात गोळा आणणारी आहे. म्हणूनच ‘जागतिक रंगभूमी दिनानिमित्त’ पुन्हा ‘टाळेबंदी झाली तर..’ या विषयावर रंगकर्मीना बोलतं करण्याचा हा प्रयत्न..

आता कुठे सावरतेय रंगभूमी

दिवाळीपर्यंत सगळे सुरळीत होणार असे वाटत असतानाच करोनाचे प्रमाण वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. पुन्हा टाळेबंदी होणार.. ही कल्पनाच करवत नाही, कारण नाटय़सृष्टी सुरू होऊन आता कुठे १०० दिवस झालेले आहेत. बोटावर मोजण्याइतक्या कलाकृती आता सुरू झाल्या आहेत. नाटय़सृष्टी ‘जेमतेम’ अवस्थेत आहे. आता जर हे संकट ओढवले तर नामुष्की होईल. काय पर्याय करावा, काय उपाय शोधावा हे इतक्या सहज सांगणे कठीण आहे. तरीही टाळेबंदी होणार नाही असे वाटते आहे; किंबहुना तसे होऊही नये. आता कुठे नाटक रुळावर आले आहे. बरेच दिग्दर्शक- निर्माते नवीन नाटक करायच्या तयारीत आहेत. एप्रिल-मे महिन्यांत अनेक नाटकांचा शुभारंभ आहे. मीही एक नवीन नाटक करतो आहे. कालच आपल्याकडे रात्रीची जमावबंदी लागू केली. याचा परिणाम रात्रीच्या सत्रात होणाऱ्या नाटय़प्रयोगांवर होईल. पुन्हा टाळेबंदी झाली तर लोकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण होईल. नाटय़ क्षेत्र पुन्हा कधी उभे राहील हेही सांगता येणार नाही. केवळ नाटकच नाही तर सगळ्या क्षेत्राला हा फटका बसेल.

– विजय केंकरे, ज्येष्ठ दिग्दर्शक

रंगमंच कामगारांची विवंचना तशीच

या जागतिक संकटातून आपण आजही पूर्णपणे बाहेर पडलेलो नाही. सर्व नियमांचे पालन करून प्रयोग सुरू झाले असले तरी करोनाची बाधा इथेही होते आहे. विशेष म्हणजे लोकांच्या मनात आजही संभ्रमाचे वातावरण असल्याने नाटकांना मनासारखा प्रतिसाद मिळत नाही आहे. वर्षभरात राज्यभरात कलेबाबत कोणतेही ठोस काम झालेले नाही. कित्येक नाटय़गृहे आजही बंद आहेत. करोनाचा आलेख कमी होत गेला तसा नाटकाचा आलेख चढत्या दिशेने जायला हवा होता, पण तसे झाले नाही. उलट करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने हा आलेख पुन्हा खाली येण्याच्या मार्गावर आहे. पूर्णत: नाटय़ क्षेत्र सुरू न झाल्याने कित्येक रंगमंच कामगारांची आर्थिक विवंचना आजही तशीच आहे. निर्माता, दिग्दर्शक, कलाकार यापलीकडे जाऊन नाटकात काम करणाऱ्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत विचार व्हायला हवा. असाच अनिश्चित संकटातून मार्ग काढण्यासाठी नाटय़ परिषदेने रंगकर्मीसाठी १० कोटी रुपये निधी जमवण्याचा संकल्प केला होता. त्यात आपल्याच काही रंगकर्मीनी खो घातला. त्यामुळे आता वर्षभरात घडलेल्या सर्व गोष्टींचे पुनरावलोकन करणे गरजेचे आहे. पुढे काय घडणार याचा अंदाज बांधून उपाय सुचवणे योग्य ठरणार नाही; परंतु शासनाने रंगमंच कामगारांच्या आणि नाटय़सृष्टीच्या प्रश्नांवर प्रकाश टाकायला हवा.

– प्रसाद कांबळी, अध्यक्ष – अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद

कलाकारांना कोण विचारतो..

एखादी चालू असलेली गोष्ट थांबणे आणि नव्याने सुरू झालेली गोष्ट बंद पडणे यात फरक आहे. आता कुठे रंगभूमी सुरू होत होती, तोवरच त्याचे पुन्हा कंबरडे मोडले तर नाटय़सृष्टी उन्मळून पडेल. गेल्या वर्षीच्या संकटातून सावरताना उद्योग-व्यवसाय सुरळीत होण्यात सगळ्यांनी पाठिंबा दर्शवला; पण कलाकारांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत असे कुणालाही वाटले नाही. कलाकारांना ना पगार आहे, ना कसल्या सुविधा आहेत. त्याला पोटपाणी आहे याचाही लोकांना सहज विसर पडतो. गेलं वर्षभर अक्षरश: लोकांनी तग धरला आहे. असली नसलेली सगळी पुंजी लावून कलाकार जगले आहेत. आता कुठे ते श्वास घेत होते तोवर पुन्हा टाळेबंदीची चाहूल लागणे धक्कादायक आहे. विशेष म्हणजे एप्रिल-मे हा खरा नाटकाचा हंगाम आहे अशात पुन्हा पडदा पडला तर तब्बल दोन वर्षे कलाकार घरी बसून राहतील; पण तसे झाले तरी त्यांना कुणीही विचारायला येणार नाही, इतकी वाईट अवस्था आपल्याकडे आहे. नट हे श्रीमंतच असतात असा गैरसमज समाजात रूढ झाला आहे. नैराश्यातून बाहेर पडायला मनोरंजन हवे असते; पण त्यांना मदतीसाठी कुणीही पुढे येत नाही; किंबहुना सरकारचेही कला क्षेत्राकडे लक्ष नाही. राजकीय पक्षांच्या सभा, बैठका सर्रास सुरू आहेत, मोठाले उद्योग सुरू आहेत मग केवळ कलेवर र्निबध असे इथले चित्र अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे. उद्योग- व्यवसायांच्या रांगेत कला  क्षेत्रात अद्याप जागा दिलेली नाही. गेल्या वर्षीच्या टाळेबंदीत मी ‘नेटक’ नावाचा उपक्रम सुरू केला. तो पुन्हा नव्याने मी सुरू करेन, पण हे प्रत्येकाच्याच उपजीविकेचे साधन होऊ शकत नाही. इथल्या लाखो कलावंत तंत्रज्ञांच्या जगण्याचा प्रश्न आजही गंभीर आहे.

– हृषीकेश जोशी, लेखक-दिग्दर्शक

पुन्हा मदतीची अपेक्षा कशी करायची?’

सरकारने पन्नास टक्के परवानगी दिली. त्यानंतरही बऱ्याच उशिराने नाटक सुरू झाले, कारण नाटक उभे करणारे निर्मातेच आर्थिक अडचणीला तोंड देत होते. गेल्या दोन महिन्यांत केवळ सात ते आठ कलाकृती सुरू झाल्या आहेत. संपूर्ण नाटय़ क्षेत्र अद्याप सुरू झाले नसल्याने आमच्यापैकी अनेकांना आजही काम मिळाले नाही. कामगारांनी नव्या नोकऱ्या शोधल्या, कुणी गाडी चालवत आहे, तर कुणी सुरक्षारक्षकाची कामे करत आहेत. बहुतांशी कामगार आजही नोकरीच्या शोधात फिरत आहेत. काहींनी कर्ज घेऊन टॅक्सी घेतली, पण प्रवाशांच्या अभावी त्यातही नुकसान होते आहे. एकीकडे जुन्याच दु:खातून सावरलेलो नसताना पुन्हा नाटय़ क्षेत्र थांबले तर याचे परिणाम अत्यंत वाईट असतील, कारण नाटक सुरू झाले असले तरी निर्मात्यांना पुरेसे बुकिंग मिळत नाही आहे. मग निर्माताच विवंचनेत असेल तर कामगारांचे पोट कसे भरणार? विशेष म्हणजे गेल्या टाळेबंदीत लोकांनी मदत केली. आता पुन्हा मदतीची अपेक्षा कशी करायची?

– किशोर वेल्ये, रंगमंच कामगार संघ

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World theater day theatre artists view on if again lockdown zws
First published on: 28-03-2021 at 00:08 IST