मराठी आणि हिंदी टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री क्षिती जोग हिची गाडी चोरीला गेल्याचे वृत्त आहे. सध्या क्षिती स्टार प्लसवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत काम करतेय.
टेलिचक्करने दिलेल्या वृत्तानुसार, २ जुलैला क्षिती शूटींगवरून रात्री उशीरा परतल्यावर तिने तिची गाडी बिल्डींगजवळ पार्क केली होती. त्यानंतर दुस-याच दिवशी तिची गाडी चोरीला गेल्याचे समोर आले. क्षिती गोरेगाव (पूर्व) येथे राहते. या घटनेची तक्रारही तिने पोलिसांकडे दाखल केली आहे. याविषयी बोलताना क्षिती म्हणाली की, आमच्या बिल्डिंगखाली केवळ एकच गाडी उभी करण्याची परवानगी आहे. त्यामुळे मी बिल्डिंगच्या जवळच गाडी उभी केली होती. दुस-या दिवशी सकाळी माझी गाडी त्याजागी नसल्याचे माझ्या लक्षात आले. यानंतर माझ्या नव-याने लगेचच पोलिसांकडे दाखल केली. तेव्हा त्याच परिसरात आणखी एक गाडी त्याचदिवशी चोरीला गेल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस याबाबत सध्या चौकशी करत आहेत. पोलीस त्यांचे काम चोख करतील आणि आम्हाला लवकरच आमची गाडी परत मिळेल अशी मी अपेक्षा करते, असेही क्षिती म्हणाली.