डोंबिवलीतील फडके रस्त्यावर एकीकडे तरुणाईचा जल्लोष होत असताना ठाण्यातील मासुंदा तलावाच्या काठी तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. ठाण्यातील तलावपाळी परिसरात यंदा दिवाळीच्या निमित्ताने तरुणाई एकवटल्याचे पाहायला मिळाले. यंदाच्या दिवाळी जल्लोषात पारंपरिक ढोलताशा पथकांच्या वादनासोबत पाश्चिमात्य ‘रॉक बॅण्ड’ची सुरावटही तरुण कलाकारांकडून आळवली जात होती. या पाश्चिमात्य सुरावटींची भुरळ पडलेल्या अनेक तरुणांची तलावपाळीच्या रस्त्यावर फेर धरला होता. त्यामुळे ठाण्यातील दिवाळी जल्लोषाला पारंपरिकते बरोबरच पाश्चिमात्य नृत्य आणि संगीताची किनार लाभली होती.
दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पहाटेपासूनच ठाणे शहरातील विविध भागातील तरुण तलावपाळीच्या दिशेने निघाले होते. पारंपरिक कुर्ता-पायजमा, पठाणी, शेरवानीचा पोशाख परिधान केलेल्या तरुणांचे जथे या ठिकाणी अवतरले होते. तरुणींमध्ये पारंपरिक नऊवारी, अनारकली कपडय़ांना विशेष स्थान दिल्याचे दिसून येत होते. राम-मारुती रस्ता, गोखले रस्ता, बी-केबीन, स्थानक परिसर आणि तलावपाळी परिसर अशा सगळ्याच भागामध्ये तरुणाईची गर्दी उसळली होती. तरुणांसोबत पुरुष आणि महिला वर्गाचाही सहभाग लक्षणीय होता. ज्येष्ठ नागरिकांचे काही कट्टेकरीही या उत्साहात सहभागी झाले होते. दुचाकी वाहने घेऊन तर काही तरुण चालतच तलावपाळीच्या आवारामध्ये दाखल होत होते. शुभेच्छा देण्याबरोबरच ‘ग्रुफी’ काढण्यामध्येही ही मंडळी दंग झाली होती. एखाद्या मित्राला यायला उशीर झाल्यास त्याला फोन करून चौकशीही केली जात होती. कार्यक्रमांची रेलचेल, शुभेच्छांची देवघेव आणि भेटीचा आनंद यामुळे एकूच दिवाळीच्या निमित्ताने तलावपाळी परिसरातील रस्ता दुमदुमून गेला होता.

रॉक बॅण्डची भुरळ
तलावपाळी परिसरामध्ये अवतरणाऱ्या या तरुणाईसाठी काही लोकप्रतिनिधींनी गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तर दुसऱ्या बाजूला शहरातील तरुणांचा ‘रॉक बॅण्ड’ही आपले सादरीकरण करत होता. नृत्याचे विविध प्रकारही काही तरुणांनी या वेळी सादर केले. अगदी फुगडीपासून हिप्पॉपचे सादरीकरणही काहींनी केले. शहरातील अनेक ढोलपथकांनी या भागात येऊन आपले वादन सादर केले. त्यालाही तरुणांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. तर मराठी अभिनय क्षेत्रातील अनेक मान्यवर कलाकारांनी तरुणाईच्या या जल्लोषाच्या माध्यमातून येणाऱ्या अगामी चित्रपट व मालिकांची जाहिरातही केली.

उत्साही वातावरणाने रस्ते अडला
दिवाळीच्या निमित्ताने तलावपाळी परिसरात अवतरणाऱ्या तरुणाईच्या गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी या भागातील वाहतूक बदल केले होते. त्यामुळे तलावपाळीकडून होणारी वाहतूक सकाळपासून बंद ठेवण्यात आली होती. पोलीस बंदोबस्तही या भागात ठेवण्यात आला होता. रस्ता बंदमुळे काही वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.