बॉलिवूडमध्ये बऱ्याच कलाकारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांची मुलं मोठ्या उत्साहात चित्रपटसृष्टीत पदार्पण करतात. अशाच नवोदित कलाकारांपैकीच एक म्हणजे अभिनेता हर्षवर्धन कपूर. अनिल कपूरचा हा मुलगा ‘मिर्झिया’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यश मिळवलं नसलं तरीही हर्षवर्धनने मात्र त्याचा चाहता वर्ग निर्माण करण्यात यश मिळवलं ही बाब नाकारता येणार नाही.

हर्षवर्धनच्या पाठिशी उभ्या असणाऱ्या त्याच्या वडिलांनी म्हणजेच अभिनेता अनिल कपूर यांनीही नेहमीच त्याचं कौतुक केलं आहे. वडिल-मुलाच्या नात्यापेक्षा या दोघांमध्ये मैत्रीच नातं पाहायला मिळतं. सोशल मीडियावर सध्या चर्चेत असणारं त्यांचं फोटोशूट पाहता अनिल कपूर आणि हर्षवर्धन हे दोघंही अगदी एकसारखेच दिसत असल्याचं लक्षात येत आहे. त्यामुळे ही ‘झक्कास’ बाप- लेकाची ‘शेम- टू- शेम’ जोडी असल्याचं म्हणायला हरकत नाही. ‘जीक्यू’ मासिकाच्या कव्हर पेजवर हर्ष आणि अनिल कपूर यांचा हा सुरेख फोटो पाहायला मिळत आहे. खुद्द अनिल कपूर यांनी हा फोटो त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे.

अनिल आणि हर्षवर्धन यांचं हे पहिलंच एकत्र फोटोशूट असून त्यांच्या नात्यामध्ये असणारे सुरेख भाव या फोटोमध्येही पाहायला मिळत आहेत. दरम्यान, या फोटोशूटच्या निमित्ताने आपल्या मुलासोबतच्या नात्याविषयी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनिल कपूर म्हणाले, ‘मी त्याची खूप काळजी करतो. कारण, हर्ष अजूनही खूप भोळा आहे असं मला वाटतं. उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्या मोठ्या दिग्दर्शकालाही तो नकार देऊ शकतो. माझ्या मते अशा वेळी समोरच्या व्यक्तीने ही बाब लक्षात घ्यावी की, त्याला त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. पण, सध्याच्या घडीला त्यांच्यासोबत काम करण्यासाठी तो तयार नाहीये.’ अनिल कपूर यांच्या या वक्तव्यामुळे हर्षवर्धनप्रती असलेली त्यांची काळजी व्यक्त होत आहे.

वाचा: …म्हणून सलमान गॅलेक्सी अपार्टमेंट कधीही सोडणार नाही

या फोटोशूटच्या निमित्ताने हर्षवर्धन आणि अनिल कपूर यांच्या नात्याची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहण्यास मिळत आहे. सध्या हर्षवर्धन त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तर, अनिल कपूर लवकरच ‘मुबारका’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. येत्या काळात वडील- मुलाची ही जोडी एखाद्या चित्रपटाच्या निमित्ताने स्क्रीन शेअर कधी करणार याबद्दलच सध्या अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे.