‘जंजीर’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला अंतरिम स्थगिती देण्यास सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे १९७३साली प्रदर्शित झालेल्या ‘जंजीर’चा रिमेक ६ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
मूळ ‘जंजीर’च्या कथा-संवादाचे कॉपीराईट आमच्याकडे असून केवळ एकदाच त्यावर सिनेमा होऊ शकतो, अशी अट आम्ही निर्माते प्रकाश मेहरा यांना घातली होती. त्यामुळे पुन्हा हा सिनेमा तयार होऊ शकत नाही, असा दावा सलीम खान व जावेद अख्तर यांनी केला होता. तसेच, निर्मात्यांकडून सुमारे सहा कोटी रुपयांची नुकसानभरपाईही त्यांनी मागितली होती. मात्र, ‘जंजीर’च्या रिमेकचे निर्माता सुमित मेहरा यांनी केवळ आपल्या पक्षात निर्णय लागल्यास नुकसानभरपाई देऊ असे सांगितले. चित्रपटावर दावा दाखल करण्यास विलंब झाला आहे. तसेच, याचिकाकर्त्यांनी रिमेकसाठी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. त्यामुळे प्रदर्शनाला स्थगिती देण्याची आवश्‍यकता नाही, असे न्यायालयाने शेवटी सांगितले.
सलीम-जावेद यांनी केलेली कॉपीराइटची याचिका अद्याप प्रलंबित आहे.