आयुष्यभराची साथ देण्यासाठी निवडलेल्या जोडीदारासोबतचे प्रेम बदलत्या काळानुसार वयाच्या वेगवेगळ्या टप्यावर कसे भासते, याचे कथारूपी सादरीकरण ‘झी युवा’च्या ‘गुलमोहर’ मालिकेमधून केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ‘वचन’ ही नवी कथा २९ आणि ३० जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता प्रसारित केली जाणार आहे. उतारवयात एकमेकांची साथ देणाऱ्या वयोवृद्ध जोडप्यावर ही कथा बेतली आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि अभिनेत्री सुहास जोशी यांनी कथेत मुख्य भूमिका साकारली असल्याने बऱ्याच कालावधीनंतर टेलिव्हिजनवर उत्तम अभिनयाची पर्वणी  प्रेक्षकांना मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वयाच्या एका विशिष्ट टप्यावर आल्यानंतर जोडीदारासोबत असलेले अनुभवांचे गाठोडे भरलेले असते. आयुष्यात अनेक चढउतार पाहिले असल्यामुळे त्यांच्यामधील प्रेम आणि विश्वास दृढ झालेला असतो. गुलमोहरच्या पुढच्या भागात सादर होणारी ‘वचन’ ही कथादेखील एका वृद्ध जोडप्याने एकमेकांना दिलेल्या वचनाची आहे. गोदावरी आणि चिंतामणरावांनी स्वत:ला मूल नसल्याची खंत बाळगली नाही. त्याऐवजी अनेक अनाथ मुलांना आपलेसे करून त्यांना मायेचे छत्र दिले. या कथेत दोघांच्याही आयुष्यातील अनुभवांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. शरीराने वृद्ध असले तरी हे दोघे मनाने तरुण असल्याने त्यांच्यामध्ये कणखरपणे भरलेले प्रेम आणि विश्वास याचा प्रत्यय या भागातून अनुभवण्यास मिळणार आहे. एवढी वर्षे एकमेकांची साथ दिल्यानंतर पुढे घडणारे प्रसंग त्यांच्यासाठी अनपेक्षित आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee yuva gulmohar tv serial
First published on: 28-01-2018 at 01:33 IST